IPL 2020: एबी डिव्हिलियर्सच्या झंझावाती खेळीमुळे बंगळुरूचा राजस्थानवर विजय

0

एमपीसी न्यूज – एबी डिव्हिलियर्सने अवघ्या 22 चेंडूत नाबाद 55 धावांची झंझावाती फटकेबाजी करीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ला राजस्थान रॉयल्स (RR) वर दणदणीत विजय मिळवून दिला.

या सामन्यात राजस्थानने बंगलोरसमोर विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य ठेवले होते. बंगलोरने हे आव्हान सात गाडी राखून अखेरच्या षटकात पूर्ण केले. बंगलोरचा यंदाच्या मोसमातला हा सहावा विजय आहे.

RCB चा कर्णधार विराट कोहली आणि सलामीचा फलंदाज देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी रचून बंगलोरच्या विजयाचा पाया रचला. पण हे दोघेही लागोपाठ माघारी परतल्यानंतर बंगलोरसमोर संकट उभं ठाकलं होतं. मात्र, या परिस्थितीतून एबी डिव्हिलियर्स याने अवघ्या 22 चेंडूत नाबाद 55 धावांची खेळी करत बंगलोरचा दणदणीत विजय मिळवून दिला.

नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारुन RR ने आपल्या डावात दमदार फलंदाजी केली. सलामीच्या रॉबिन उथप्पानं 22 चेंडूत 41 धावा केल्या. पण बेन स्टोक्स केवळ 15 धावा काढून माघारी परतला.

बॅड पॅच सुरू असलेला संजू सॅमसनही पुन्हा अपयशी ठरला. त्यानं अवघ्या 9 धावा केला. त्यानंतर आलेल्या कर्णधार स्मिथ याने RR च्या डावाला आकार दिला. स्मिथ याने यंदाच्या मोसमातील तिसरे अर्धशतक करताना 36 चेंडूत 57 धावा फटकावल्या. तर जोस बटलरनं 24 धावा केल्या. त्यामुळे राजस्थानला सहा बाद 177 धावांची मजल मारता आली.

बंगलोरकडून ख्रिस मॉरिसनं 26 धावात 4 विकेट्स घेतल्या. तर युजवेंद्र चहललनं दोन विकेट्स घेतल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.