IPL 2021: बातमी आयपीएलची – राजस्थानने आजही होवू दिला नाही हैदराबादचा सनराईज

55 धावांनी मिळवला मोठा विजय, बटलरने मारले तुफानी शतक

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – दिल्लीचे अरुण जेटली मैदान काही संघासाठी जणू नवसंजीवनी घेऊनच आलेले आहे, आधी रुळावरून घसरलेली मुंबई एक्सप्रेस सुसाट सुटली तर आज हैदराबादविरुद्ध राजस्थान रॉयल ठरले. हैदराबाद संघाने आधी कर्णधार बदलून पाहिला, मग फलंदाजीचा क्रम मात्र हे सगळे करूनही पदरी आली शेवटी ती निराशाच.

आयपीएल मधल्या आजच्या 28 व्या सामन्यात नवा गडी नवे राज्यच्या धर्तीवर केन विल्यम्सने नाणेफेक जिंकली खरी पण ती एकच आशादायक गोष्ट त्याच्या बाबत घडली. त्याने राजस्थान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ज्याचा राजस्थान संघाने जबरदस्त लाभ घेत हैदराबाद संघाच्या गोलंदाजीला दे माय धरणीठाय केले. खास करून जोस बटलरने.

त्याने आपल्या आयपीएलमधल्या शतकाला गवसणी घालताना अतिशय आक्रमक फलंदाजी केली.फक्त 64 चेंडूत 124 धावा करताना त्याने आठ षटकार आणि अकरा चौकार मारले. त्याला कर्णधार संजू सॅमसनने 48 धावा करून चांगली साथ दिली.आणि संघाला 20 षटकात 220 धावांची मजल मारून दिली.

या धडाक्यामुळे हैदराबाद संघाच्या गोलंदाजांचे पृथक्करण पारच बिघडले, अपवाद रशीद खानचा,त्याने 24 चेंडूत 24 धावा देताना एक बळी मिळवला.

120 चेंडूत 221 धावा ते ही पाठलाग करताना काढणे कधीच सोपे नसते.त्यात डेव्हिड वॉर्नर नसल्याने धडाकेबाज सुरुवात कोण करणार अशी शंका होतीच, मात्र मनीष पांडे व बेअरस्टोने सहा षटकातच 57 धावांची सलामी देत सामना रंगतदार होईल असे चित्र निर्माण केले खरे, पण यानंतर हैदराबाद संघाच्या विकेट्स लागोपाठ पडत गेल्याने आधीच कठीण असलेले हे लक्ष जास्तच कठीण झाले.

पांडे, बेअरस्टोनंतर विजयशंकर, केन विल्यमसन,नबी असे मोठमोठे फलंदाजी स्वस्तात बाद झाल्याने हैदराबाद संघाची अवस्था 15 षटकांच्या आतच 127 वर पाच अशी कठीण झाली. राजस्थान किती मोठ्या फरकाने रॉयल विजय मिळवेल इतकीच उत्कंठा शिल्लक होती.

त्यात मुस्तफिजूर आणि ख्रिस मॉरिसने अचूक गोलंदाजी करत प्रत्येकी तीन बळी टिपले आणि हैदराबाद संघाला केवळ 165 धावात गारद करत तब्बल 55 धावांनी मोठा विजय मिळवला.

या विजयाने राजस्थान संघाने आम्ही स्पर्धेत अजून तरी नक्कीच आहोत, हा संदेश इतर संघांना दिला तर हैदराबाद संघाला मात्र अजूनही विजयाच्या सूर्योदयाची अपेक्षा आहेच. तुफानी फलंदाजी करून आक्रमक शतक नोंदवणारा बटलर सर्वार्थाने सामनावीर ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.