IPL 2023-सुर्याच्या तेजात गुजरात होरपळले

गुजरात टायटन्सला 27 धावांनी पराभूत करत मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड चालूच.

एमपीएससी न्यूज(विवेक कुलकर्णी) : क्रिकेटविश्वात मिस्टर 360 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या आयपीएलमधल्या पहिल्या शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गतविजेत्या गुजरात टायटन्सवर 27 धावांनी विजय मिळवत आपल्या सहाव्या विजयासह प्ले ऑफची जागा चांगलीच बळकट करत अंकतालिकेतही चौथा(IPL 2023) क्रमांक पटकावला आहे.मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिवसरात्र झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाचे मुंबईची प्रचंड उष्णता आणि सूर्यकुमार यादवची तुफानी फलंदाजी यांच्यामुळे चांगलेच घामटे निघाले.

Chakan : भीमा नदीच्या काठावरून दिड लाख रुपयांची देशी दारु जप्त

आयपीएल सीझन 16 च्या 2023 मधल्या कालच्या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून मुंबईचा धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा यशस्वी कारनामा लक्षात ठेवून त्यांना प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले खरे, पण मुंबई इंडियन्सने याही संधीचे सोने करत प्रथम फलंदाजी करत आपल्या निर्धारित षटकात 218 धावांचा मोठा डोंगर उभा केला,आणि नंतर गोलंदाजीतही कमाल दाखवत गुजरात टायटन्सचा डाव 8 बाद 103 असा गुंडाळून टाकला,यावेळी मुंबई संघ मोठ्या फरकाने जिंकेल असे वाटत असतानाच राशीद खानने पठाणी वसुली करत मुंबईच्या कमकुवत दुव्यावर जबरदस्त हल्ला चढवत पराभवातले अंतर कमी केले.

अखेर राशीद खानची एकाकी झुंज कमी पडली आणि मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी विजय झाला.खराब सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्स एकदा विजयी पथावर आली की मग ते इतर संघासाठी अतिशय धोक्याचे लक्षण असते .या समजाला बळकटी देणारा मुंबई इंडियन्सचा यावर्षीचा प्रवास खरोखरच इतर संघासाठी एक धोक्याचा इशारा आहे (IPL 2023) हे नक्की.

प्रथम फलंदाजी करताना रोहीत आणि ईशान किशनने धडाकेबाज सुरुवात करत पहिल्या गड्यासाठी 61 धावांची सलामी दिली. दोघेही चांगले खेळत आहेत असे वाटत असतानाच रोहीत पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि राशीद खानच्या गोलंदाजीवर 18 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकार मारत 29 धावा काढून बाद झाला.

ही छोटी खेळी मोठी होईल असे वाटत असतानाच तो बाद झाला . त्यानंतर थोड्याच वेळात ईशान किशन सुद्धा खानच्याच गोलंदाजीवर 31 धावा काढून बाद झाला.यानंतर आला तो मागील सामन्यात सूर्यकुमार यादवला समर्थ साथ देणारा नेहल वदेरा,पण त्याला आज मात्र विशेष कमाल दाखवता आली नाही,  तो केवळ 18 धावा करून तंबूत परतला.

यानंतर आला तो नवोदित विष्णू विनोद, पण त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात चांगलेच टेम्परामेन्ट दाखवत जास्तीत जास्त खेळायची संधी सूर्यकुमारला दिली अन इथून सुरु झाला तो “द सुर्या शो”मागिल काही सामन्यापासून आपल्या खास लयीत आलेल्या सुर्याने आपले तेज दाखवायला सुरुवात करताच त्यात गुजरात टायटन्सचा संघ जणू खरोखरच होरपळून गेला, मैदानाच्या चारीही बाजूला जबरदस्त फटके मारत सूर्याने एक अविस्मरणीय खेळी करत आपल्या आयपीएलमधल्या पहिल्या शतकाचीही नोंद केली.

डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारत त्याने आपले शतक पूर्ण केले,त्यांना विष्णू विनोदने 30 धावा करत उत्तम साथ दिली. सुर्या 103 धावा करुन नाबाद राहिला,त्याच्या तडाख्यातही राशीद खानने आपल्या(IPL 2023) लौकिकाला साजेशी गोलंदाजी करत सर्वाधिक तीन बळी मिळवले.

या मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना गुजरात संघाची सुरुवात अतिशय खराब झाली.त्यांच्या डावाच्या दुसऱ्याच षटकात वृध्दीमान सहा आकाश मढवालच्या गोलंदाजीवर केवळ 2 धावा करून पायचीत झाला,तर त्यानंतर आलेला कर्णधार पंड्याही चार धावा काढून बेहरनडॉफची शिकार ठरला.

यातून सावरण्याआधीच गीलही आज संघासाठी शुभ कामगिरी करू शकला नाही . तोही आकाश मढवालची दुसरी शिकार ठरला.यापाठोपाठ विजय शंकर ,आणि अभिनव मनोहरही स्वस्तात बाद झाले . गुजरात टायटन्सची अवस्था 8 व्या षटकात 5 बाद 55 अशी झाली .यावेळी मुंबई संघाला मोठया अंतराने विजय मिळणार असे वाटत होते ,मात्र डेविड मिलर आणि राशीद खान यांच्या झुंजार आणि आक्रमक खेळाने गुजरात संघाने किमान ती नामुष्की टाळण्यात तरी नक्कीच यश मिळवले.

राशीद खानने तर जबरदस्त फटकेबाजी करत केवळ 32 चेंडूत 3 चौकार आणि  दहा षटकार मारत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना चांगलेच मेटाकुटीला आणले,मात्र त्याला दुसऱ्या बाजूने फारशी साथ न मिळाल्याने त्याची ही झुंज अपयशी ठरली आणि गुजरात संघाला 27 धावांनी पराभव स्विकारावा लागला.मुंबई इंडियन्सने विजय मिळवला असला तरी त्यांच्या गोलंदाजांना अखेरचा घाव घालण्यात येणारे अपयश त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे,हे मात्र नक्की.

या पराभवाने गुजरातला फारसा फरक पडणार नसला तरी मुंबई इंडियन्ससाठी हा विजय प्ले ऑफची वाट आणखी सुखकर करणारा ठरला आहे.आपल्या पहिल्या आयपीएल शतकाची नोंद करणारा सूर्यकुमार यादव सलग दुसऱ्या सामन्यातही सामन्याचा मानकरी ठरला आहे,आणि त्याचे असे फॉर्मात असणे मुंबई इंडियन्स साठी खूप मोठे टॉनिक (IPL 2023)ठरणारे आहे.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स
5 बाद 218
रोहीत 29,किशन 31,विष्णू विनोद 30,सूर्यकुमार यादव नाबाद 103
राशीद 30/4
विजयी विरुद्ध

गुजरात टायटन्स

8 बाद 191
विजय शंकर 29,मिलर 41,खान नाबाद 79
मढवाल 31/3,कार्तिकेय 37/2,चावला 36/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.