IPL News : गुजरात टायटनने मिळवला केकेआरवर आठ धावांनी विजय

(विवेक  कुलकर्णी)

एमपीसी न्यूज – हार्दिक पंड्याचे गुजरात संघाने कोलकाता संघाला आठ धावांनी नमवत आपले विजयी अभियान चालूच ठेवले.
बऱ्यापैकी रोमहर्षक सामन्यात अखेर गुजरात टायटन संघाने कोलकाता नाईट रायडर्सवर आठ धावांनी विजय मिळवून आपल्या विजयी अष्टमेघ वारूची चौखूर  उधळण चालू ठेवून आणखी एक रोमहर्षक विजय प्राप्त केला आहे.

नवोदित रिंकू सिंग, रसेलने केलेले शर्थीचे प्रयत्न अखेर अपयशी ठरले आणि गुजरात संघाने आठ धावांच्या नाममात्र फरकाने का होईना पण आणखी एक यश मिळवून आपल्या नावापुढे आणखीन दोन अंकही वाढवत पहिल्या चार संघात स्थानही मिळवले.

मुंबई येथील डी वाय पाटील मैदानावर आजच्या पहिल्या सामन्याला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन संघामधे लढत झाली,गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या 20 षटकात 9 गडी गमावून 156 धावा केल्या, हार्दिक पंड्याने एका बाजूने विकेट्स पडत असतानाही एकट्याने दोन हात करत केलेल्या 67 धावा गुजरात संघासाठी सर्वाधिक आणि मोलाच्याही ठरल्या. के के आरसाठी रसेलने चार तर साऊदीने तीन बळी मिळवले.

खरेतर गुजरात संघाची सुरुवात अतिशय खराब झाली,  गुणवत्ता आणि टेम्परामेन्ट खच्चून भरलेले असूनही सातत्याने फलंदाजी न करणे, हे शुभमन गीलचे ठळकपणे दिसून आलेले गुण, आजही त्याने चांगली सुरुवात केली असे म्हणेपर्यंत आपली विकेट फेकलीही, 5 चेंडूत 7 धावा काढून तो साऊदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर पंड्याने तिसऱ्या क्रमांकावर स्वतः येत वृद्धीमान साहा सोबत दुसऱ्या गड्यासाठी 75 धावांची भागीदारी करत डाव बऱ्यापैकी सावरला, या हंगामाचे खास वैशिष्ट्य जर कुठले ठळकपणे दिसले असेल तर ते म्हणजे पंड्याचे नेतृत्वगुण  आणि  अष्टपैलूत्व, संकटसमयी कर्णधाराने जी काही जबाबदारी घ्यायला हवी असते ती तो बिनदिक्कत घेतो, आजही त्याने तेच केले, डावाच्या दुसऱ्याच षटकात शुभमन बाद झाल्यानंतर त्याने स्वतः खेळायला येत विस्कटलेली घडी सावरण्यासाठी पुढे येण्याची मानसिकता दाखवली,ही भागीदारी फुलली आहे असे वाटत असतानाच उमेशने साहा वैयक्तिक 25 धावांवर बाद करून गुजरात संघाला दुसरा धक्का दिला.त्याच्या जागी आलेल्या मिलरने कर्णधाराला चांगली साथ देत आणखी 40 धावांची भागीदारी करत एका मोठ्या धावसंख्येकडे कूच करत असल्याचे संकेतही दिले,मात्र नेमक्या महत्वाच्या क्षणी मिलर युवा शिवम मावीच्या गोलंदाजीवर उमेश यादवच्या हातात झेल देऊन बाद झाला आणि केकेआर सामन्यात वापसी करण्यात यशस्वी झाले.

त्याच्या पाठोपाठ हार्दिक पंड्याही 67 धावा काढून तंबुत परतला,आणि गुजरात संघाची चांगलीच घसरगुंडी उडाली, पंड्याने आपले 7 वे  अर्धशतक पूर्ण करताना 49 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकार मारत 67 धावा केल्या, पण त्याच्या विकेट नंतर गुजरात संघांचे  उर्वरित फलंदाज आपल्या कर्णधाराच्या चांगल्या कामगिरीत भर घालू शकले नाहीत आणि एकापाठोपाठ एक तंबुत परतल्यानंतर गुजरात संघाच्या चार बाद 138 नंतर डावाच्या अखेरीस 9 बाद 156 अशा धावा फलकावर दिसू लागल्या. शेवटच्या षटकात रसेलने केवळ 5 धावा देत चार गडी बाद केले,यामुळेच गुजरात संघाला अशा छोट्या धावसंख्येवर समाधान मानावे लागले.रसेलला साऊदीनेही तीन बळी मिळवून चांगली साथ दिली.

120  चेंडूत 157 धावा आपल्या चौथ्या विजयासाठी आणि या स्पर्धेत पुढे वाटचाल करण्यासाठी केकेआरला हव्या असताना केकेआर संघाची सुरुवातही खराबच झाली. मोहम्मद शमीने सॅम बिल्लिंग (4) आणि सुनील नारायणला (0)आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकात तंबूत पाठवून गुजरात संघाला एकदम झकास सुरुवात करून दिली आणि केकेआरच्या गोटात एकच खळबळ उडवून दिली. यावेळी केकेआर संघ चांगलाच अडचणीत दिसत होता, आणि मैदानावर होते ते नितीश राणा आणि कर्णधार श्रेयस अय्यर, केकेआरच्या सर्व आशा या दोन खेळाडूंवरच होत्या. मात्र नितीश राणाही संघ अडचणीत असताना योगदान देण्यात यशस्वी ठरला नाही आणि लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर  फक्त 2 धावा काढून बाद झाला आणि केकेआरची अवस्था तीन बाद 16 अशी कठिण झाली.

गुजरात संघ जोरदाररित्या अग्रेसर होत होता, यामुळे केकेआर संघावरचे दडपण वाढत होते, आणि याचाच फायदा उठवत यश दयालने कर्णधार श्रेयसची छोटी खेळी समाप्त करून गुजरात संघाला मोठेच यश मिळवून दिले, श्रेयस आज 12 धावाच करू शकला. यानंतर मात्र क्रिकेटची पुन्हा एकदा अनिश्चितता दाखवत केकेआर संघाने प्रतिकार सुरू केला , तुम्हाला नवल वाटेल, विश्वासही बसणार नाही कदाचित ,पण नवल वाटावे अशी फलंदाजी करत नवोदित रिंकू सिंगने सर्वाना प्रभावीत करत आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

आयपीएल आजही कित्येक सच्चा क्रिकेट रसिकांना तितके भावत नाही, पण याच आयपीएलने भारतीय क्रिकेटचे भविष्य जगाला दाखवले आहे,यश दयाल,वेंकटेश अय्यर ,आयुष बदोनी ,अशी असंख्य उज्ज्वल भवितव्य याच निमित्ताने जगापुढे आलेले आहे, त्यातच आज रिकू सिंगने आपले नाव नक्कीच ऍड केले आहे,अतिशय आत्मविश्वासाने तो आकर्षक आणि आक्रमकही खेळत होता, त्याला दुसऱ्या बाजूने वेंकटेश अय्यरही बऱ्यापैकी साथ देत होता.काहीवेळा पूर्वीच एकदम संकटात दिसत असलेला केकेआर संघ सामन्यात परत येत आहे असे वाटत असतानाच यश दयालने रिंकुला चकवले आणि ही जोडी फोडून सामना पुन्हा एकदा गुजरात संघाच्या बाजूने झुकला.पाठोपाठ रशीद खानने आपली जादू दाखवत वेंकटेश अय्यर आणि शिवम माविला बाद केले आणि केकेआर संघाला आणखीनच नामोहरम केले.याचदरम्यान रशीद खानने मावीला बाद करून आपला 100 वा आयपीएल बळीही प्राप्त केला. यावेळी केकेआर संघ पराभवाच्या अगदीच जवळ होता, पण तरीही त्यांना अजूनही विजयाची आस होती,कारण मैदानावर होता रसेल द मसेल,आणि त्याच्या जोडीला आक्रमक फलंदाजी करू शकणारा उमेश यादव.

या जोडीने आक्रमक फलंदाजी करत आपली लढाई चालूच ठेवली,नो बॉलच्या रूपाने जीवदान मिळाल्यानंतर आक्रमक रसेलने आपला चिरपरिचित अंदाज दाखवायला सुरुवात केली आणि घणाघाती फलंदाजी करायला सुरुवात केली,शेवटच्या सहा चेंडूत 18 धावा हव्या होत्या, आणि त्या रोखण्याची जबाबदारी होती अल्झारी जोसेफ वर.ती त्याने चोख पार पाडताना रसेलची स्फोटक खेळी 48 धावांवर समाप्त केली,रसेलने सहा षटकार आणि एक चौकार मारत 25 चेंडूत 48धावा ठोकल्या पण तो संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरला नाही.अखेर कोलकाता संघ विजयापासून 8 पावले दूर राहिला आणि या आणखी एका विजयासह गुजरात संघ आपले विजयी अभीयान दिमाखात चालू ठेवण्यात यशस्वी ठरला.

संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन
9 बाद 156
पंड्या 67,साहा 25,मिलर 27,तेवतिया 17
उमेश 31/1,साऊदी 24/3,रसेल 5/4
विरुद्ध
कोलकाता नाईट रायडर्स
8 बाद 148
रिंकु सिंग 35,व्ही अय्यर 17,श्रेयस 12,
शमी 20/2,खान 22/2,फर्ग्युसन 33/1,यश दयाल 42/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.