IPL News : रोमहर्षक विजयासह कोहलीचा संघ प्ले ऑफसाठी ठरला पात्र

मॅक्सवेल आणि चहल ठरले विजयाचे शिल्पकार

एमपीसी न्यूज  (विवेक कुलकर्णी) – रविवारच्या आजच्या पहिल्या सामन्यात कोहलीच्या संघाने अष्टपैलू खेळ करत किंग्ज 11 पंजाबला सहा धावांनी हरवत प्ले ऑफसाठी पात्र होण्याची कामगिरीही केली आहे.

शारजाच्या मैदानावर सामने होतात ते बऱ्याचदा कमी धावसंख्येचे,पण आज प्रथम आरसीबीने ते खोटे ठरवत 20 षटकात 164 धावा करून. आणि नंतर किंग्ज पंजाबला केवळ सहा धावांनी पराभूत करून प्ले ऑफ मधले आपले स्थानही पक्के केले.

आज कोहलीने नाणेफेक जिंकताच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो मोठी धावसंख्या रचून सार्थही केला. विराट कोहली आणि देवदत्त पडीकलने सलामीला चांगली सुरूवात करून दिली. दोघेही चांगले खेळत होते,68 धावांची भागीदारी झाली असताना कोहली हेन्रीक्सच्या गोलंदाजीवर 24 चेंडूत 25 धावा करून बाद झाला आणि दुसऱ्याच चेंडूवर ख्रिस्तीयन सुद्धा हेन्रीक्सची शिकार झाला.यामुळे हेन्रीक्स हॅटट्रिकवर आला होता,पण त्यानंतर आलेल्या मॅक्सवेलने त्याची हॅटट्रिक हुकवली आणि नंतर मॅक्स वेल खेळ करत डाव ही सावरला.

दुसऱ्या बाजूने पडीकल सुद्धा भरात आहे असे वाटत असतानाच तो सुद्धा हेन्रीक्सची तिसरी शिकार ठरला,पडीकलने आज 38 चेंडूत 40 धावा काढताना दोन षटकार आणि चार चौकार मारले.यावेळी आरसीबीची अवस्था तीन गडी बाद 73 होती. त्यामुळे पंजाब टीम खुशीत होती, पण नंतर एबी आणि ग्लेनने तितक्याच धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला, दोघांच्या बॅटमधून चौकार षटकार बरसत होते ज्यामुळे एकदा तर चेंडू थेट मैदानाबाहेर सुद्धा गेला होता. मॅक्सवेलने आज आपले 11वी आयपीएल मधले अर्धशतक नोंदवले. धावा वाढवण्याच्या नादात एबी धावबाद झाला,त्याने 23 धावा काढल्या, पाठोपाठ अर्धशतकी खेळ करणारा मॅक्सवेलही बाद झाला,पण त्याने त्याची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली होती, चार उत्तुंग षटकार आणि ती चौकार मारून त्याने केवळ 33 चेंडूत घणाघाती 57 धावा केल्या. ज्यामुळे आरसीबीने शारजा मैदानावर 164 धावांचे विशाल लक्ष उभे केले होते. पंजाब किंग्जकडून हेन्रीक्सने 4 षटकात केवळ 12 धावा देत तीन गडी बाद केले, तेवढेच बळी शमीने सुद्धा घेतले पण त्यासाठी त्याने तब्बल 39 धावा दिल्या.

विजयासाठी 165 धावांचे विशाल लक्ष सर करण्यासाठी के एल राहुल आणि मयंकने तुफानी सुरुवात केली. दोघेही आकर्षक आणि आक्रमक खेळत होते, पण मयंकचा धडाका काही औरच होता, ज्यामुळे किंग्ज 11 पंजाबने दहा षटकातच 91 धावा जोडल्या, पण याचवेळी के एल राहुल 39 धावा करून शहबाजच्या गोलंदाजीवर बाद झाला,पाठोपाठ 8 धावा जोडून पुरन सुद्धा बाद झाला.त्याला चहलने केवळ तीन धावावर बाद केले. यानंतर मारक्रम आणि पडीकलने किल्ला लढवत धावा जोडायला सुरुवात केली खरी पण चहलने उत्तम गोलंदाजी करताना अर्धशतक केलेल्या मयंकला आणि नंतर थोड्याच वेळात सर्फराजला सुद्धा तंबूत पाठवून पंजाब संघाला दोन मोठे धक्के दिले.

मयंकने 42 चेंडूत 57 धावा केल्या पण जम बसल्यानंतरही त्याचे बाद होणे संघाला त्रासदायक ठरले. ज्याने पंजाब किंग्जचा डाव सावरला नाही तो नाहीच. शाहरुख , हेन्रीक्सने प्रतिकार केला खरा पण तो फारच तोकडा पडला, शेवटच्या षटकात पंधराहून अधिक धावा हव्या असल्याने पंजाबच्या फलंदाजाना हे शिवधनुष्य पेलणारे नव्हतेच , शेवटी त्यांना सहा धावा कमी पडल्या आणि आरसीबीचा संघ या विजयासह प्ले ऑफ साठी पात्रही ठरला, कोहलीच्या संघाला आजपर्यंत एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही, त्यातच त्याने यापुढे तो कर्णधार नसेल हे जाहीर केलेले असल्याने त्याचा संघ त्याला विजयी निरोप देणारं का, हे येत्या काहीच दिवसात कळणार आहेच. मागील काही वर्षांत सतत सातत्यपूर्ण कामगिरी करुनही विश्वकपसाठी वगळल्या गेलेल्या यजुवेंद्र चहलने ते सर्व मागे सोडून फक्त उत्तम कामगिरी कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे,आजही त्याने उत्तम गोलंदाजी करत आपल्या चार षटकात 29 धावा देताना तीन महत्वपूर्ण बळी मिळवून निवड समितीला प्रश्न विचारला आहे, नाही का?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.