Pimpri : मुरुमात अनियमितता; अधिका-याला भविष्य निर्वाह निधीची रक्कम देऊ नका

स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांची मागणी

एमपीसी न्यूज – मोशी येथील कचरा डेपोच्या मुरूम टाकण्याच्या कामात झालेल्या अनियमिततेबाबत ई क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आरोग्याधिकारी प्रभाकर रामचंद्र तावरे यांची चौकशी सुरू आहे. चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात 16 लाख 50 हजारांची रक्कम लेखा परिक्षणात वसूलपात्र दर्शविली आहे. ही रक्कम वसूल होत नाही. तोपर्यंत तावरे यांना सेवानिवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधी देऊ नये, अशी मागणी स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी केली आहे.

याबाबत मडिगेरी यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आरोग्याधिकारी पदावर प्रभाकर रामचंद्र तावरे कार्यरत आहेत. ते 31 मे रोजी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. परंतू, त्यांच्या काळात मोशी कचरा डेपो येथे मुरूम टाकण्याच्या कामात अनियमितता झाली आहे. याबाबत चौकशी समिती गठीत करण्यात आली होती.

समितीने सादर केलेल्या अहवालानुसार कार्यवाही झालेली नाही. या कामात 16 लाख 50 हजार 968 एवढी रक्कम लेखा परिक्षणात वसूलपात्र दर्शविलेली आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन तावरे यांच्यावर कारवाई होत नाही अथवा ही रक्कम वसूल होत नाही तोपर्यंत तावरे यांना सेवानिवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधी देऊ नये, अशी मागणी स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.