Jejuri : श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेसाठी हजारो भाविक जेजुरीत दाखल

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी (Jejuri) गडावर सोमवती यात्रेसाठी हजारो भाविक दाखल झाले आहेत. सकाळी खंडोबा देवाच्या पालखीचे कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान झाले. त्यानंतर इतर धार्मिक विधी पार पडत आहे. सोमवती अमावस्येला असलेल्या या यात्रेसाठी राज्याच्या सर्व भागातून भाविक येत असतात. भाविकांची गर्दी झाल्यानंतर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक देखील वळवण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास खंडोबा देवाची पालखी कऱ्हा नदीत स्नानासाठी मार्गस्थ झाली. या पालखीसोबत सोमवती यात्रेचा सोहळा सुरु होतो. दुपारी खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या स्नानाचा सोहळा होणार आहे. पालखी कऱ्हा नदीत आल्यानंतर भाविक मोठ्या संख्येने इथे गर्दी करतात. त्यासाठी भाविकांना पिण्याच्या पाण्याची आणि महाप्रसादाची सोय नदीच्या बाजूच्या परिसरात करण्यात आली आहे.

Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात लक्ष्मी पूजन दिवशी 20 ठिकाणी आग

या यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी (दि. 13) वाहतूक बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

सोमवारी पहाटे पाच वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतुक बदल – सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे यामार्गाने वळविण्यात आली आहेत. पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतुक बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव रोड मार्ग बारामती या मार्गे वळविण्यात आली आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतुक बदल – बारामती व निरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे या मार्गे वळविण्यात आली आहे.

सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतुक बदल – पुणे बाजुकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपुर-कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंद या मागे वळविण्यात आली आहे. हे निर्बंध यात्रेसाठी येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी शिथिल (Jejuri) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.