Junnar: हिंदूंच्या भावना घेऊन अयोध्येला निघालो – उद्धव ठाकरे

शिवनेरीवरील माती कलश नेणार अयोध्येला

एमपीसी न्यूज – प्रत्येकवेळी निवडणुका आल्या की राम मंदिराचा मुद्दा घेतला जातो. पण राम मंदिर खरंच कधी होणार आहे ? आणखीन किती निवडणुका तुम्ही ‘मंदिर वही बनाएंगे’ करत मूर्ख बनवत राहणार आहात, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला. तसेच शिवनेरी गडावरची माती नाही. तर, तमाम हिंदूंच्या भावना आहेत. महाराज ज्या भूमीमध्ये जन्माला आले. त्या ठिकाणीची माती घेऊन मी अयोध्येला निघालो आहे, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे येत्या 24 आणि 25 तारखेला अयोध्येला जाणार आहेत. अयोध्येला प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याआधी तमाम हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी शिवनेरीचे दर्शन ठाकरे यांनी आज (गुरुवारी)घेतले. महाराजांच्या पदस्पर्शान पावन झालेल्या मातीचा कलश ठाकरे अयोध्येला नेणार आहेत. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार शिवाजीराव आढळराव उपस्थित होते.

“आणखी किती निवडणुकांमध्ये राम मंदिराचा मुद्दा घेतला जाणार आहे? हे विचारायला मी अयोध्येत जात आहे. अयोध्येला प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. ही केवळ शिवनेरीची माती नाही. तर, तमाम हिंदूंच्या भावना आहेत. ही माती तिथे पोहोचल्यावर ख-या अर्थाने मंदिर उभारणीच्या कार्याला चालना मिळेल. महाराज ज्या भूमीमध्ये जन्माला आले, त्या ठिकाणीची माती घेऊन मी अयोध्येला निघालो आहे” असे ठाकरे म्हणाले. तसेच आपल्यवर टीका करणा-यांची लायकी किती आहे, हे मला ठाऊक आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, ठाकरे यांच्या स्वागतासाठी गडावर जोरदार तयारी करण्यात आली होती. रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.