Chinchwad News : कलेने सन्मान दिला ; लोककलावंत वसंत अवसरीकर

एमपीसी न्यूज – ‘मी शिकलो नाही, लहानवयातच मी तमाशात काम करु लागलो. विविध भूमिका केल्या मात्र कलेने मला सन्मान दिला,’ असे मत ज्येष्ठ लोककलावंत वसंत अवसरीकर यांनी व्यक्त केले. थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस रंगमंचच्या वतीने आयोजित रंगयात्री महोत्सवात ज्येष्ठ लोककलावंत वसंत अवसरीकर यांची प्रकट मुलाखत झाली त्यावेळी ते बोलत होते.

रंगयात्री महोत्सवाच्या चौथ्या दिवशी ज्येष्ठ लोककलावंत वसंत अवसरीकर यांची प्रकट मुलाखत आणि पिंपंरी चिंचवड साहित्य मंचचा विनोदी आणि विडंबन कवितांचा कार्यक्रम सादर झाला. मुलाखत ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांनी घेतली.

यावेळी आठवण सांगताना वसंत अवसरीकर म्हणाले की, ‘वयाच्या सातव्या वर्षापासून मी तमाशात काम करु लागलो. माझे अजोबा ढोलकीवादक होते. मला लिहायला वाचायला येत नसल्याने तमाशाच्या दिवशी थोडावेळ आधी मला संवाद सांगितले जायचे. ते संवाद ऐकून तमाशात सादर करायचे. केवळ सादर न करता ते चांगल्या पद्धतीने फुलवायचे आणि विनोदनिर्मिती करायची. मी ज्येष्ठ लोककलावंत दादू इंदुरीकरांच्या संचात काम करु लागलो. हळुहळू भूमिका मिळत गेल्या. ज्येष्ठ कलाकार निळू फुले यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करता आल्याचे समाधान आहे. त्यांच्यासोबत 11 वर्षे काम करण्याचा सुरेख अनुभव आहे.’

गाढवाच लग्न नाटकाबाबत काय अनुभव आहे याचे उत्तर देताना ते म्हणाले की, ‘गाढवाच लग्नचे साधारण 6 हजार पेक्षा जास्त प्रयोग झाले. त्यातून माझी ओळख निर्माण झाली. तमाशात काम करताना हजरजबाबीपणा हवाच,’ असे ते म्हणाले. ‘कलाकाराचे कितीही कौतुक केले तरी कौतुक बर्फासारखे विसरायचे,’ असा सल्ला कलाकारांना दिला.

‘कधीही अधिकच्या कमाईचा कधी विचार केला नाही. आहे त्यात सुखी राहिलो. अनेकवेळा आर्थिक चणचण भासली. कलाकारांनी प्रपंच सांभाळून नाटक करायला पाहिजे. आता करोनाकाळात लोककलावंतांना मिळणारी पेन्शन दोन ते तीन महिने बंद आहे,’ असे अवसरीकर यांनी सांगितले.

उत्तररंगात पिंपरी चिंचवड साहित्य मंचचा विनोदी आणि विडंबन कवितांचा कार्यक्रम सादर झाला. यावेळी राजकारण, पैठणी, संसार अशा विविध विषयांवर गंमतीदार कविता सादर केल्या. राज अहेरराव, राजेंद्र घावटे, प्रदीप गांधलीकर,रघुनाथ पाटील, सविता इंगळे, रमेश वाकनीस, माधुरी विधाटे,मधुश्री ओव्हाळ, कैलास भैरट, नंदकुमार मुरडे, रमेश वाकनीस आदींनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन ऋतुजा दिवेकर यांनी केले. तर आभार साक्षी धादमे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.