Kalewadi : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गटाचे पक्ष कार्यालय

एमपीसी न्यूज – शिवसेना-भाजप सरकारमध्ये (Kalewadi ) सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आता शरद पवार गटाने पक्ष कार्यालय थाटले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रागा पॅलेस जवळ काळेवाडी येथे पक्ष कार्यालय उभारले असून शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. तर, शहराध्यक्षपदासाठी पाच माजी नगरसेवकांनी मुलाखती दिल्या असल्याचेही सांगण्यात आले.

2 जुलै रोजी अजित पवार हे समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजितदादा सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील संपूर्ण पक्ष संघटना त्यांच्यासोबत गेली. राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय खराळवाडीत आहे.

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीत असताना खराळवाडीत मध्यवर्ती कार्यालय सुरु केले होते. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, अनेक माजी नगरसेवकांनी अजितदादांना साथ दिली. त्यामुळे खराळवाडीतील कार्यालयही अजित पवार गटाकडे राहिले आहे.

शरद पवार गटाला पिंपरी-चिंचवडमध्ये पक्ष कार्यालय नव्हते. आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काळेवाडीत कार्यालय (Kalewadi) उभारण्यात आले आहे.  कार्यालयात मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्समधून अजित पवारांचा फोटो वगळण्यात आला आहे. शरद पवार आणि जयंत पाटलांचा फोटो लावण्यात आला आहे.

कार्यालय उभारुन शरद पवार गटाने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. याच कार्यालयातून आता राष्ट्रवादी काँग्रेचे पुढचे कार्य चालणार असल्याचे  युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पक्षाचे सुसज्ज असे पक्षाचे कार्यालय उभारण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लवकरच आदरणीय शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांची वेळ घेतली जाईल. त्यांच्या हस्ते उद्घाटन आणि मेळावा घेण्यात येणार असल्याचे कार्यकारी समितीचे सदस्य काशिनाथ नखाते यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.