Kartik : ओळख मराठी महिन्यांची भाग 8 – दीपोत्सवाचा महिना कार्तिक!

एमपीसी न्यूज (रंजना बांदेकर) – मराठी महिन्यांची माहिती या लेखमालेतील आठवा लेख. या लेखात माहिती घेऊयात कार्तिक (Kartik) महिन्याची! 

पाना फुलांची तोरण दारी l
अंगणी देखणी साजीरी रांगोळी ll

उटण्याचा सुगंध पसरू दे घरोघरी l
आली दिवाळी आली दिवाळी ll

फटाक्यांच्या आतषबाजीत, दिव्यांच्या रोषणाईत आणि सगळ्यांच्या मनात उत्साहाची लाट घेऊनच कार्तिक महिन्याची सुरुवात होते.

कार्तिक महिना! हिंदू पंचांगातील आठवा महिना. शंकर पार्वतीचा ज्येष्ठ पुत्र ‘कार्तिकेय’ याचा जन्म या महिन्यात झाला असल्यामुळे या महिन्याला कार्तिक हे नाव मिळाले आहे.

कार्तिक महिन्याचा पहिला दिवस कार्तिक प्रतिपदा ! बलिप्रतिपदा किंवा पाडवा या नावाने ओळखला जातो. विक्रम संवत्सराचा पहिला दिवस. नववर्ष दिन. असा हा पाडवा. वर्षातल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि शेवटचा मुहूर्त!

कार्तिक महिन्यात येते दिवाळी l आनंदाची मांदियाळी ll

पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी येतो भाऊबीज हा सण. यमधर्म या दिवशी आपली बहीण यमाईच्या घरी गेले. बहिणीने त्यांना ओवाळले. यमधर्माने आपल्याकडे असलेली सर्व संपत्ती व सोने बहिणीला देऊन टाकले. तेव्हापासून कार्तिक महिन्यातील दुसरा दिवस ‘यमद्वितीया’ भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. गोवर्धन पूजा देखील याच महिन्यात केली जाते.

या महिन्यात येणारा आणखी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे कार्तिकी एकादशी. चातुर्मासाची समाप्ती या दिवशी होते. आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी ‘म्हणतात तर कार्तिकी एकादशीला ‘प्रबोधन एकादशी ‘असे म्हणतात. याच महिन्यात एकादशी पासून तुळशी विवाह प्रारंभ होतो. एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केले जातात.

या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला ‘त्रिपुरारी’ पौर्णिमा म्हणतात. याच दिवशी भगवान शिवशंकरांनी ‘ त्रिपुर’ नावाच्या राक्षसाचा नाश केला होता. या दिवशी सर्व मंदिरांच्या कळसावर, दीपमाळांवर दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला जातो.

हा महिना अनेक कृष्ण लीलांनी युक्त आहे. पाडव्याच्या दिवशी कृष्णाची माखनलीला म्हणजे कृष्णाने लोणी चोरून खाल्ले म्हणून यशोदा मातेने त्याला उखळाला बांधले तो दिवस होय. तसेच कृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून पडणाऱ्या मुसळधार पावसापासून व इंद्राच्या कोपापासून गोकुळवासियांचे प्राण वाचवले होते.

शिखांचे गुरु गुरुनानक यांचीही जयंती याच महिन्यात असते.
कार्तिक महिन्यात दीपदान व पहाटेच्या स्थानाला फार महत्त्व आहे. या महिन्यात केलेले धार्मिक कार्य तुम्हाला नेहमीच्या धार्मिक कार्यात मिळणाऱ्या फळापेक्षा कितीतरी पटीने अधिक फळ देते. असे स्कंदपुराणात सांगितले आहे.

दिवस सुगीचे सुरु जाहले l
ओला चारा बैल माजले l
शेतकरी मन प्रसन्न झाले ll

या कवितेत सांगितल्याप्रमाणे शेतात हिरवेगार पीक डोलत असते. त्यामुळे शेतकरी राजा आनंदात असतो .सर्वत्र आनंदी आनंद पसरवणारा असा हा महिना आहे .तो सर्वांना सुख समाधान देणारा जावो हीच सदिच्छा.🙏

सर्वांना दिवाळी व नववर्षाच्या शुभेच्छा! 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.