Pune : कर्वे रस्त्यावर आता चक्राकार वाहतूक

एमपीसी न्यूज – वनाज ते धान्य गोदाम मेट्रोमार्गात नळस्टॉप चौकात दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे एसएनडीटी चौक ते अभिनव चौकापर्यंत डेक्कनकडे येणारा कर्वे रस्ता बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून या मार्गावरील वाहतूक चक्राकार पद्धतीने वळविण्यात येणार आहे. तत्पूर्वी वाहतूक पोलीस, महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकारी या नियोजनाची संयुक्‍त पाहणी करणार आहेत.

या बदलाबद्दलची माहिती या मेट्रो मार्गाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी दिली. कर्वे रस्त्यावरील मेट्रो मार्गासह अभिनव चौक आणि नळस्टॉप चौकात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो आणि इतर वाहतुकीसाठीचा दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी झाले असून प्रत्यक्ष कामास पुढील आठवड्यात सुरूवात होणार आहे.

हा पूल एसएनडीटी महाविद्यालयापासून पुढे जाणार असल्याने येथील मेट्रो स्टेशन आणि या दुमजली उड्डाणपुलाचे काम एकाच वेळी सुरू केले जाणार आहे. त्यासाठी महामेट्रोने वाहतूक पोलिसांची परवानगी मागितली होती. ती मिळाली आहे. मात्र, ही चक्राकार वाहतूक केल्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन येत्या मंगळवारी वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते या महामेट्रो आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी करणार असून या पाहणीनंतर पुढील एक ते दोन दिवसांत ही चक्राकार वाहतूक सुरू होणे अपेक्षित असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. या दुमजली उड्डाणपुलासाठी एकूण 18 खांब बांधले जाणार असून त्यातील 13 खांबांवर दुमजली उड्डाणपूल असणार आहे. तर 5 खांबावर पुलाच्या उताराचा भार असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.