Kasarwadi News : पंधरा दिवस अन्नाचे सेवन न करता 80 वर्षांच्या आज्जींनी कोरोनाला हरविले

एमपीसी न्यूज – पंधरा दिवस अन्नाचे सेवन केले नाही, असे असताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर कासारवाडीतील 80 वर्षांच्या विमल मोरे या आज्जींनी कोरोनाला हरविले आहे. गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  ‘इंडियन एक्स्प्रेस’चे वरिष्ठ पत्रकार मनोज मोरे यांच्या त्या मातोश्री होत. 

पंधरा दिवसांपूर्वी विमल मोरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी 15 दिवस जेवण केले नाही. त्यामुळे त्यांचे वजन देखील कमी झाले होते. त्या खूप घाबरल्या होत्या. खचून गेल्या होत्या.

कुटुंबियांनी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे त्यांची भीती कमी झाली. विमल मोरे यांनी जेवण करण्यास सुरुवात केली. उपचाराला साथ दिली. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यांनी कोरोनाला हरविले असून गुरुवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

याबाबत बोलताना विमल मोरे म्हणाल्या, कोरोना झाल्याचे समजताच मी खूप घाबरले होते. भीतीने खचून गेले होते. बातम्या बघून माझ्या मनात मोठी भीती निर्माण झाली होती. 15 दिवस जेवण देखील जात नव्हते. कुटुंबियानी माझे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले. त्यामुळे माझी भीती कमी झाली.

मी मनातून खूप घाबरले होते. खरे तर घाबरण्याचे काही कारण नाही. मनातून खचून जाऊ नये. कोरोनाची भीती अनाठायी आहे. कोणतीही भीती न बाळगता सकारात्मक विचार करावा. आपण कोरोनाला नक्की हरवू शकतो. पण, काळजी घेणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.