Khadki News : जामिनावर बाहेर असलेल्या माथेफिरूने पत्नी व दोन वर्षाच्या मुलीला धावत्या रेल्वेतून दिले ढकलून

एमपीसी न्यूज – माथेफिरू पतीने धावत्या रेल्वेतून पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलीला (Khadki News) सर्व प्रवाशांच्या समोर ढकलून दिले. त्यात चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला असून पत्नी गंभीर जखमी आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.19) खडकी रेल्वेस्थानक परिसरात घडला.आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तो  सराईत गुन्हेगार असून सध्या जामिनावर बाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

Pune News : पुण्यात सुखोई चा अपघात थोडक्यात टळला

 

 

आकाश भोसले असे मातेफिरूचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर आर्या आकाश भोसले (रा. पद्मावती) असे मृत बालिकेचे नाव आहे. तिची आई वृषाली (वय 22) ही गंभीर जखमी झाली आहे. आकाश हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

 

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश याने पत्नी वृषालीला हाजी अली दर्ग्यात दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले होते. तो पत्नी आणि मुलीला घेऊन रेल्वेने मुंबईला जात होता. खडकी रेल्वे स्थानक परिसरात आल्यानंतर त्याने पत्नीला दरवाजाजवळ बोलावून घेतले. आर्या वृषाली च्या कडेवरच होती. वृषाली बेसावध असतानाच आकाशने दोघी मायलेकींना जोरात धक्का मारून रेल्वेतून ढकलून दिले.

 

प्रवाशांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली. या घटनेत वृषाली आणि मुलगी आर्या या दोघी गंभीर जखमी झाल्या. पोलिसांनी दोघींना ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान आर्याचा मृत्यू झाला. आकाश एका खुनाच्या गुन्ह्यात सध्या जामिनावर बाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.