Khed : खेड तालुक्‍यात डॉ. अमोल कोल्हे यांनी गावभेटीद्वारे साधला मतदारांशी संवाद

एमपीसी न्यूज- वैयक्तिक पातळीवर मी काही बोलणार नाही, मी जे करणार आहे त्यावरच बोलणार आहे आणि विकासालाच माझे प्राधान्य राहणार आहे. तसेच 15 वर्षांत ठोस विकासकामे कोणतीही केली नसल्याने आता चौकार कसला यांचा त्रिफळाच उडवायचा आहे, अशा शब्दांत डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदार आढळराव यांच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ काल (रविवार दि. 21) खेड तालुक्‍यात गावभेटीद्वारे संवाद साधण्यात आला. ठिकठिकाणी डॉ. कोल्हे यांचे जंगी स्वागत करुन ग्रामस्थांनी परिवर्तनाचा निर्धार व्यक्‍त केला. त्यावेळी कन्हेरसर, होलेवाडी, वाफगाव, गोसासी, वरुडे, जरेवाडी, गुळाणी, भाम येथील प्रचारसभेत उमेदवार डॉ. कोल्हे बोलत होते.

यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार राम कांडगे, निर्मला पानसरे, अशोक राक्षे, सुनील राक्षे, शांताराम भोसले, सभापती बाळासाहेब ठाकूर, कैलास सांडभोर, राष्ट्रवादीचे तालुका प्रवक्‍ते सुनील थिगळे, काँग्रेसचे नेते विजय डोळस, मनसे तालुका अध्यक्ष संदीप पवार, सरपंच अजय भागवत, विनायक घुमटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, “आपण धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी खासदार संसदेत पाठवतो; पण 15 वर्षे काय केले ? याचे उत्तर खासदारांकडे नाही. त्यामुळे ते हीन पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. मी मतदार आहे आणि मला या मतदारसंघाचा विकास अभिप्रेत आहे. त्यानुसार मी भौगोलिक, ऐतिहासिक स्थितीनुसार सर्वांगीण विकासासाठी कृती आराखडा तयार केला आहे. यावेळी माजी आमदार ऍड. राम कांडगे, वंदना सातपुते, अनिल राक्षे, सुनील थिगळे, सरपंच अजय भागवत यांचेही भाषण झाले.

माजी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, “पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण असो, किंवा जीवघेणी वाहतूक कोंडी, पुणे-नाशिक रेल्वेचे काय झाले ? चाकण विमानतळ स्थलांतरित कोणामुळे झाला ? यासह अनेक प्रश्‍न आहेत, ज्यांची सोडवणूक गेल्या पंधरा वर्षांत झाली नाही. चाकण विमानतळ स्थलांतर झाल्याने औद्योगिक भागाचे मोठे नुकसान झाले आहे. बेरोजगारीचा आलेख वाढला आहे. विकास सोडा उलट संपूर्ण मतदारसंघ अधोगतीकडे गेला आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.