Khed : खेड बाजार समितीत आमदार दिलीप मोहितेंच्या पॅनेलची सरशी

विरोधी सर्वपक्षीय पॅनेलची देखील मुसंडी

एमपीसी न्यूज : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Khed) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. या निवडणुकीत तब्बल 99 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण 3896  मतदारांपैकी 3839 मतदारांनी मतदान केले. या ठिकाणी राष्ट्रवादी विरूद्ध सर्व पक्षीय अशी लढत झाली. तरी देखील या निवडणुकीत राष्ट्रवादीने विजय मिळवला. आमदार मोहिते कसे सर्वपक्षीयांना पुरून उरले? याकडे राष्ट्रवादीकडून लक्ष वेधण्यात आले; मात्र राष्ट्रवादीच्या एकहाती ताब्यात असलेल्या बाजार समितीत सर्वपक्षीयांनी प्रवेश केला आहे. खुद्द आमदार मोहिते यांचा निसटता विजय झाला आहे.

विजयसिंह शिंदे, अनुराग जैद , सागर मुऱ्हे आदी नवख्यांनी आमदार मोहिते यांच्यापेक्षा अधिक मते घेतली आहेत. बाजार समितीत राष्ट्रवादीला 10, ठाकरे गटाला 3, भाजपला 2, काँग्रेसला 1 जागेवर यश मिळालं आहे. तर व्यापारी मतदारसंघातील 2 अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.

खेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या श्री भीमाशंकर सहकार पॅनेलला 11 जागा, तर सर्वपक्षीय सर्वपक्षीयांच्या श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलला 7 जागा मिळाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

बाजार समितीचे दोन माजी सभापती, पंचायत समितीचे दोन माजी सभापती उपसभापती अशा अनेक दिग्गज मंडळीना पराभवाचा सामना करावा लागला. सर्वपक्षीय भीमाशंकर परिवर्तन पॅनेलचे प्रमुख पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचे बंधू विश्वास बुटे यांचा पराभव झाला.

तर आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढलेले बाजार (Khed) समितीचे माजी सभापती नवनाथ होले व विलास कातोरे यांच्यासह तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे यांनाही दारूण पराभव स्वीकारावा लागला.
मतमोजणी दरम्यान हमाल मापाडी गटातील सयाजी मोहिते यांचा पहिला निकाल बाहेर पडला.सयाजी मोहिते यांना 226 पैकी 201 अशी भरघोस मते मिळाली. प्रतिस्पर्धी केळकर यांना 22 मते मिळाली.

व्यापारी मतदारसंघातून माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांचे बंधू माणिक गोरे, तसेच महेंद्र गोरे निवडून आले. माणिक गोरे यांना सर्वाधिक 580, तर महेंद्र गोरे यांना 567 मते मिळाली. विद्यमान संचालक राम गोरे यांचा येथे पराभव झाला. सोसायटी सर्वसाधारण गटात मोठी चुरस झाली. त्यात आमदार मोहिते पाटील यांना अवघी 589 मते मिळाली; मात्र त्यांचा निसटता विजय झाला. अन्य उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे – जयसिंग भोगाडे 812 , विजयसिंह शिंदे (869), कैलास लिंभोरे (975), विनोद टोपे (748), सोमनाथ मुंगसे (639), तर अनुराग जैद 754 मते मिळवून विजयी झाले. महिला राखीवमधून कमल कड (960) आणि क्रांती सोमवंशी (600) या विजयी झाल्या.

मात्र, तेथे पुनर्मतमोजणी अर्ज दाखल करण्यात आल्याने हा निकाल राखून ठेवण्यात आला होता. रात्री एक वाजता हा निकाल घोषित करण्यात आला. क्रांती सोमवंशी आणि कमल कड या दोन उमेदवारच निवडून आल्याचे फेर मतमोजणी नंतरही स्पष्ट झाले.

ओबीसी प्रवर्गात हनुमंत कड विजयी झाले. कड यांना 942, तर त्यांचे प्रतिस्पर्धी योगेश पठारे यांना 300 मते मिळाली. अनुसूचित जमातीमधून विठ्ठल वनघरे यांचा विजय झाला. ग्रापंचायत गटातून सर्वसाधारणमधून सागर मुर्‍हे आणि रणजित गाडे, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अशोक राक्षे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. अनुसूचित जमातीमधून सुधीर भोमाळे विजयी झाले. दोन्ही पॅनल कडून मतदारांवर अक्षरशः पैशांचा पाऊस पडला. अनेकांनी सर्वांकडून स्वीकार करण्याचे धोरण ठेवले.

त्यामुळे या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांची उधळण झाल्याची तालुका भर चर्चा आहे. या निवडणुकीत आमदार मोहितेंच्या श्री.भीमांशकर शेतकरी सहकारी पॅनेलचा बाजार समितीतील विजय यंदा खडतर झालेला पहावयास मिळाला. आमदार मोहिते यांनी या निवडणुकीत विरोधकांकडून पैशांचा वारेमाप वापर झाल्याने अनेक दिग्गज पराभूत झाल्याचे माध्यमांना सांगितले आहे.

Pimpri : मोकाट श्वानांच्या वाढत्या उपद्रवाविरोधात मानवी हक्क आयोगात दावा दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.