Khelo India : खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वातही सर्वसाधारण विजेतेपदावर शनिवारी आपली मोहोर उमटवली. (Khelo India) महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने जलतरणात तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्राने स्पर्धेत 56 सुवर्ण, 55 रौप्य, 50 कांस्य असी एकूण 161 पदके मिळविली. हरियाणा (41 सुवर्ण, 32 रौप्य, 55 कांस्य) अशा 128 पदकांसह दुसऱ्या, तर यजमान मध्य प्रदेश (33 सुवर्ण, 30 रौप्य, 27 कांस्य) 96 पदकांसह तिसऱ्या स्थानी राहिले.जलतरणात महाराष्ट्राने मुलांच्या विभागात सांघिक विजेतेपद, तर मुलींच्या विभागात सांघिक उपविजेतेपद मिळविले.

महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56, 55, 50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. यापूर्वी 2019 पुणे आणि 2020 आसाम येथेही महाराष्ट्र विजेते ठरले होते. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी तीन सुवर्ण आणि प्रत्येकी एका रौप्य, तसेच ब्रॉंझपदकाची कमाई केली. कुस्तीत नरसिंग पाटील ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी अपेक्षाने 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत 33.92 सेकंदात जिंकली. मुलांच्या 50 मीटर फ्री-स्टाईल शर्यतीत जयवीर मोटवानीने 24.32 सेकंद वेळ देत सोनेरी कामगिरी केली. याच स्पर्धा प्रकारात अर्जुनवीर गुप्ता रौप्यपदकाचा मानकरी ठरला. (Khelo India) महाराष्ट्राला आजचे आणि स्पर्धेतील अखेरचे सुवर्णपदक 4 बाय 100 मीटर फ्री-स्टाईल रिले शर्यतीत मुलांनी मिळवून दिले. या संघात ऋषभ दास, अर्जुनवीर गुप्ता, शुभंकर पत्की, वेदांत माधवन यांचा समावेश होता. त्यांनी 3 मिनिट 37.65 सेकंद अशी वेळ दिली. मुलींच्या 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात धृती अग्रवाल तिसरी आली. तिने 2 मिनिटे 28.67 सेकंद अशी वेळ दिली.

कुस्तीत नरसिंग पाटील ला ब्रॉंझ

महाराष्ट्राला खेलो इंडिया स्पर्धेतील कुस्तीमध्ये शेवटच्या दिवशी एका ब्रॉंझपदकाची कमाई झाली. कोल्हापूरच्या नरसिंग पाटील याने फ्री स्टाईल विभागातील 55 किलो गटात हे यश संपादन केले. त्याने राजस्थानच्या अनुज कुमार याच्यावर शानदार विजय मिळविला. उपांत्य फेरीत त्याला राजस्थानच्या ललित कुमार याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. नरसिंग हा बेळगाव येथील आर्मी बॉईज इन्स्टिट्यूटमध्ये सराव करीत आहे.‌

महाराष्ट्राला कुस्तीमध्ये यंदा येथे दोन सुवर्ण, तीन रौप्य व तीन कांस्यपदकांची कमाई झाली. स्पर्धेत महाराष्ट्राला योगासन, तलवारबाजी या क्रीडाप्रकारात घवघवीत यश मिळाले. मल्लखांबमध्येही महाराष्ट्राचे खेळाडू चमकले. जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने आपली छाप पाडली.(Khelo India) सायकलिंगमध्ये पूजा दानोळेने आपला ठसा उमटविला. टेबल टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, कुस्ती, नेमबाजी या प्रकारातही यश मिळविले.

वीस क्रीडा प्रकारात पदक

महाराष्ट्राने स्पर्धेत 22 क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. यापैकी वीस क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने किमान एक तरी पदक कमावले. केवळ कलरीपटायु आणि गतका या दोन खेळात महाराष्ट्र पदक मिळवू शकला नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.