Chinchwad News : युवासेनेच्या उपशहर युवा अधिकारीपदी राजेंद्र तरस

एमपीसी न्यूज -युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी पिंपरी-चिंचवड शहर युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड युवा अधिकारीपदी किवळे -विकासनगर येथील युवासैनिक राजेंद्र तरस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार युवासेनाप्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही नियुक्ती केली आहे.

पिंपरी चिंचवडमधील नियुक्त्या पुढीलप्रमाणे

शहर अधिकारी : विश्वजीत बारणे, उपशहर अधिकारी : राजेंद्र तरस , योगेश वाडकर, चिटणीस : अभिजीत गोफण, शहर समन्वयक : रुपेश पाटील, विधानसभा अधिकारी : निलेश हाके (पिंपरी), माऊली जगताप (चिंचवड)

राजेंद्र तरस यांनी युवा सेनेच्या माध्यमातून किवळे-विकासनगर भागात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या लॉकडाऊन कालावधीत त्यांनी सर्वसामान्य अन्नधान्य, शिधा वाटप करून मोठा दिलासा दिला होता.कोरोना रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठीही त्यांनी खूप प्रयत्न केले होते.

बिलाअभावी डिस्चार्ज न देणारे तसेच मृतदेह ताब्यात देण्यास नकार देणाऱ्या खासगी रुग्णांलयांनाही तरस यांनी दणका दिला होता. गेल्या दोन वर्षांपासून शिवसेना आणि युवासेनेच्या माध्यमातून तरस यांनी किवळे परिसरात सामाजिक कार्याचा ठसा उमटविला आहे. या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना  युवा सेना पिंपरी चिंचवड उपशहर युवा अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन वर्षांपासून केलेल्या समाजसेवेचे फळ म्हणून युवा सेनेच्या उपशहर युवा अधिकारीपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. आगामी महापालिका निवडणुकीत युवा सेना आणि शिवसेनेचे शिलेदार निवडून आणणे हे आपले प्रमुख ध्येय आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य राहील. युवासेनेचे मावळ लोकसभा संपर्कनेते राजेश पळसकर, जिल्हा समन्वयक अनिकेत घुले, पिंपरी चिंचवड शहर अधिकारी विश्वजीत बारणे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेची संघटनात्मक बांधणी मनबुत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राजेंद्र तरस यांनी नियुक्तीनंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.