IPL News : कोहलीच्या संघाने राजस्थानवर सात गडी राखून मिळवला ‘विराट’ विजय

एमपीसी न्यूज : ( विवेक कुलकर्णी) सुरुवातीला सपाटून मार खाल्ल्यानंतर सुद्धा योग्य वेळी सावरत आरसीबी गोलंदाजानी जबरदस्त गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला दीडशेच्या आत रोखले आणि नंतर त्यांच्या फलंदाजीने तशीच कामगिरी करत राजस्थान रॉयल्स संघाचा सात गडी राखून पराभव करत मोठा विजय मिळवला आणि याच सोबत 14 गुण मिळवून अंतिम चार मधले स्थान जवळपास पक्केही केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघामध्ये आज झालेल्या आयपीएल 2021 च्या आजच्या 43 व्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला,जो किमान सुरुवातीच्या आठ षटकापर्यंत तरी चुकला असे वाटावे अशी जोरदार सुरुवात राजस्थानच्या यशस्वी जैस्वाल आणि एविन लेविस या दोन सलामीवीरानी केली. चौकार षटकरांची आतिषबाजी करत या दोघांनी आश्वासक सुरुवात करून दिली.

दोघांच्या खेळाचा धडाका बघता आज राजस्थान रॉयल्स संघाचा चांगला दिवस असावा असे वाटायला लागले असतानाच यशस्वी जैस्वाल सिराजच्या हाती झेल देऊन ख्रिस्तीयनचा बळी ठरला, त्याने 22 चेंडूत 31 धावा काढताना दोन षटकार आणि तीन चौकार ठोकले. यावेळी राजस्थानच्या 8 षटकातच 77 धावा झाल्या होत्या. त्याच्या जागी कर्णधार संजू आला जो मागील सामन्यात मोठी खेळी खेळला होता,

आज तर त्याच्या संघाला चांगली सुरुवात सुद्धा मिळाली होती, त्यामुळे राजस्थान रॉयल्सचे समर्थक मोठ्या खेळीची अपेक्षा करतही होते, दोघांनी संघाला शतकी धावसंख्येपर्यंत पोहोचवले सुद्धा, पण….आपले अर्धशतक करून लेविस दुसऱ्या गड्याच्या रुपात 58 धावा काढून बाद झाला.

त्याने 37 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकार मारत 58 धावा चोपल्या. त्याला गार्टनने श्रीकरच्या हाती झेलबाद केले, तो बाद काय झाला राजस्थान रॉयल्सची गाडी सुद्धा पटरीवरुन खाली घसरली, दोन बाद 100 या समाधानकारक अवस्थेतुन सहा बाद 127 अशी बिकट अवस्था त्यानंतरच्या काहीच षटकात झाली. यात संजू सॅमसनचा बळी सुद्धा सामील होता.

113 वर तर लागोपाठ दोन बळी गेले होते, साधारण 180 च्या आसपास जावू शकेल असे वाटणारे राजस्थान रॉयल्स किमान 150 तरी करतील का अशी आशंका यायला लागली होती. सुरुवातीला मार खाणाऱ्या आरसीबी संघाच्या गोलंदाजानी मधल्या षटकात जबरदस्त मुसंडी मारत राजस्थान रॉयल्सची मधली फळी कापून काढत आधीची भरपाईच केली जणू ख्रिस मॉरिसने थोडीफार आक्रमकता दाखवल्याने कसेबसे राजस्थान रॉयल्सची धावसंख्या 149 पर्यंत पोहचली.

हर्षल पटेलने आज पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी करत तीन बळी घेतले तर शाहबाज अहमदने व यजुवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेत त्याला उत्तम साथ दिली.चांगल्या सुरुवातीनंतरही झालेल्या घसरगुंडीने राजस्थान रॉयल्सने आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुर्हा ड मारुन घेतली होती. आता ती भरपाई गोलंदाजीत काढण्याची वेळ आली होती.

एक तर 150 च धावांची आघाडी आणि दुसरे म्हणजे आरसीबीची मजबूत फलंदाजी, यामुळे राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजावर आधीच दडपण होते,त्यातच विराट कोहली आणि देवदत्त पडीकल यांनी तुफानी हल्ला करत आक्रमक सुरुवात केली,हे कमी वाटावे असे खराब क्षेत्ररक्षण राजस्थान रॉयल्स कडून झाले,

दोन्हीही आक्रमक आणि फॉर्ममध्ये असलेल्या सलामी वीरांना एकेक जीवदान सुद्धा या दरम्यान मिळाले, बघताबघता आरसीबीने 5.2 षटकातच 48 धावा केलेल्या असताना देवदत्त पडीकल 17 चेंडूत 22 धावांवर मुस्तफिजुरच्या चेंडूवर त्रिफळा बाद झाला. आणि आणखी दहाच धावा वाढलेल्या असताना कर्णधार कोहली रियान परागच्या चपळ क्षेत्ररक्षणाचा बळी ठरला.

विराटने 20 चेंडूत 25 धावा केल्या. अचानक दोन बळी ते ही लागोपाठ गेल्याने सामन्यात चमत्कार होईल अशी आशा राजस्थान रॉयल्सला होती पण आपल्याला जे वाटते ते हमेशा होतेच असे नाही ना?श्रीकर भरत आणि ग्लेन मॅक्सवेलच्या मनात आणि मनावरसुद्धा कसलेही दडपण नव्हते, दोघेजण सहजपणे खेळत होते आणि भागीदारी सुद्धा वाढवत होते.

तेही फारशी जोखीम न घेता,षटकार चौकार न मारताही वेगवान धावा जमवता येतात, त्या होत असल्या की गोलंदाज सटपटतातच, मग खराब चेंडुचा योग्य समाचार घेणे हे योग्य धोरण या दोघांनीही राबवत संघाला विजया जवळ आणले आणि हीच जोडी संघाला विजय मिळवून देईल असे वाटत असतानाच श्रीकर 35 चेंडूत 44 धावा काढून मुस्तफिजुरचा बळी ठरला.

पण याचवेळी ग्लेन मॅक्सवेलने टॉप गियर टाकला आणि 20/20 मध्ये आपल्या नावाचा दरारा का आहे हे सप्रमाण सिद्ध केले. ख्रिस मॉरिसवर जबरदस्त हल्ला चढवत त्याने आपले आयपीएल मधले दहावे अर्धशतक पूर्ण केले तर या हल्ल्यात ख्रिस मॉरिस सुद्धा आपल्या गोलंदाजीवर 50 धावा देत महागडा गोलंदाज ठरला.

विजयाची औपचारिकता एबीडीने चौकार मारत पुर्ण केली. या विजयाने आरसीबी संघाची पहिल्या चार संघात राहण्याची शक्यता आणखीनच पक्की झाली, तर राजस्थान रॉयल्सने मात्र आपल्यापुढील आव्हान हकनाक खडतर करून टाकले आहे.

जबरदस्त आक्रमक अर्धंशतकी खेळी करून संघाला विजयी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल सामनावीर होईल असा कयास असताना उत्तम गोलंदाजी करून चार षटकात  18 धावा देत दोनमहत्वपूर्ण  बळी घेणाऱ्या यजुवेंद्र चहलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.