CSK vs KKR Match : चेन्नईवर कोलकाता नाईट राईडर्स संघाने मात करत विजयी सलामी

एमपीसी न्यूज : (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) गतविजेत्या चेन्नई संघावर सहा गडी आणि 9 चेंडू राखत कोलकाता नाईट राईडर्स संघाने मात करत विजयी सलामी दिली आहे. ड्यु फॅक्टरच्या झालेल्या अन उठवलेल्या जबरदस्त फायद्यामुळे श्रेयस अय्यरने आपल्या नेतृत्वाखाली या मोसमातल्या पहिल्याच आणि केकेआर साठीच्या पहिल्याच सामन्यात चार वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या चेन्नई संघाला सर्वच आघाड्यावर मात देत एक मोठा आणि जबरदस्त पराभवाचा धक्काही दिला आहे.

कर्णधारपदाचा त्याग करत निव्वळ खेळाडू म्हणून खेळत असलेल्या महेंद्रसिंग धोनीची बहुमूल्य अर्धशतकी खेळी चेन्नई संघासाठी वांझोटी ठरली तर आपल्या अस्तित्वासाठी झगडत असलेल्या अजिंक्य रहाणेचे अर्धशतक हुकले असले तरी त्याच्या 44 धावाच केकेआरच्या विजयात मोलाच्या ठरल्या.

बहुप्रतिक्षित,आयपीएल पंधरावा सीझन अखेर सुरू झालाच,तब्बल दोन महिन्याच्या आसपास चालणारा हा क्रिकेट सोहळा भलेही सच्चा क्रिकेट रसिकांच्या नजरेत फारसा लोकप्रिय नसेलही,पण जगभरातल्या असंख्य क्रिकेट रसिकांना ज्याची प्रचंड उत्सुकता असते तो आयपीएल सोहळा आज सुरू झालाच.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर आजच्या या मोसमातल्या पहिल्या सामन्यात गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता सुपर रायडर्स या दोन चॅम्पियन संघात आज पहिली लढत झाली.नवी विटी नवे राज्य च्या धर्तीवर नवीन मोसम नवीन कर्णधार अशा काहीशा वेगळ्या पद्धतीने सुरू झालेल्या आजच्या या सामन्यात दोन्हीही संघाचे कर्णधार नवीन होते.

जगभरातल्या क्रिकेटरसिकांच्या माहीने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अचानक नेतृत्वाचे शिरस्त्राण खाली उतरवून ठेवले आणि माझा वारसदार सर (हे त्यानेच ठरवलेले)जडेजा असे सांगितले. थँक्स टू सीएसके संघ व्यवस्थापन, त्यांनी या निर्णयाचा आदर करत जडेजाचा कर्णधार म्हणून अभिषेक केला आणि आतापर्यंत चार वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या सीएसकेने जडेजाला सन्मानाने सिंहासनावर बसवत नवीन मोसमाची सुरुवात केली.

आज केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने(जो मागील कित्येक मोसमात दिल्लीचा कर्णधार म्हणून खेळला)नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नशीब म्हणा वा हा निर्णय योग्य म्हणा श्रेयसला अतिशय जोरदार सुरुवातही आज लाभली.

गतमोसमात सर्वात जास्त धावा करून सर्वाना प्रभावित करणाऱ्या ऋतुराजचा या मोसमातला ऋतू आज काही फुलला नाही आणि तो भोपळा न फोडताच उमेश यादवच्या षटकात सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर नितीश राणाच्या हातात झेल देऊन तंबुत वापस गेला.यावेळी चेन्नईच्या खात्यावर केवळ दोन धावा दिसत होत्या,ज्यात 26 धावांची भर पडली न पडली तोच कॉन्व्हेलाही उमेशने वैयक्तिक  तीन धावावर श्रेयसच्या हातात झेल द्यायला लावून चेन्नई संघाला दुसरा धक्का दिला.

दोन बाद 28 अशा कठीण परिस्थितीनंतर  रॉबिन उथपा आणि अंबाती रायडू यांनी काही साहसी फटके मारत संघाला सावरण्यासाठी प्रयत्न सुरु केले असे वाटत होते न होते तोच वरूण चक्रवर्तीने खतरनाक रॉबिनला चकवले आणि उरलेले काम यष्टीरक्षक जॅकसनने पूर्ण केले.

रॉबिनने 21 चेंडूत 2 चौकार आणि तेव्हढेच षटकार मारत 28 धावा केल्या,यानंतर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अंबाती रायडूही केवळ 15 धावा करून धावबाद झाला आणि याच दडपणात नवखा शिवम दुबेचा खेळ आंद्रे रसेलने खल्लास करताच गतविजेता संघ अकराव्या षटकाच्या आतच पाच बाद 61 अशा बिकट परिस्थितीत दिसू लागला.मात्र त्यांच्यासाठी सर्व काही संपले असे मुळीच नव्हते. कारण मैदानावर होते एमएसडी आणि सर जडेजा.

या जोडीने कसलेही दडपण न घेता संघाची नौका पैलतीरावर नेताना सहाव्या गड्यासाठी 55 चेंडूत 70 धावांची अखंडीत भागीदारी करताना सीएसकेला 131 धांवाचा टप्पा पार करुन दिला. महेंद्रसिंग धोनीने एक जबरदस्त खेळी करताना आयपीएल मधले आपले वैयक्तिक 25 वे अर्धशतक केवळ 38 चेंडूत पूर्ण करत आपला दमखम पुन्हा एकदा सिद्ध केला.

ज्यात 7 चौकार आणि एक षटकार सामील होता, त्याला जडेजाने 28 चेंडूत 26 धांवा काढून चांगली साथ दिली,पण केकेआरसाठी हे आव्हान कितपत अवघड असेल याची आशंका जडेजासह सर्वांना नक्कीच होती. केकेआर कडून उमेश यादवने 20 धावात दोन गडी बाद करत सर्वोत्तम गोलंदाजी केली,त्याला  चक्रवर्ती आणि रसेलने एकेक गडी बाद करून चांगली साथ दिली.

केवळ 132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकआरने अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर या नव्या जोडीला सलामीला पाठवून श्रेयस अय्यरने आपल्या नेतृत्वकौशल्याची लगेच आश्वासक झलक दाखवली.या जोडीने पहिल्या गड्यासाठी 38 चेंडूत 43 धावांची सलामी देत चांगली सलामीही दिली.

दोन्हीही फलंदाज चांगले खेळत आहेत असे वाटत असतानाच डी ब्रावोने अय्यरला एका सुंदर स्विंगवर चकवले आणि चेंडु त्याच्या बॅटची कड घेत धोनीच्या हातात विसावला,या पहिल्या यशाने सीएसकेची गाडी रुळावर येईल असे जडेजाला वाटले असेलही पण नितीश राणाच्या मनात असे काहीही नव्हते,त्याने आक्रमक अंदाजात 17 चेंडूत 21 धावा फटकावत संघाला लवकरात लवकर विजय गाठून देण्याची घाई केली, ज्याचा अचूक फायदा ब्रावोने उचलून त्याला रायडूच्या हातून झेलबाद करून केकेआर संघाला दुसरा धक्का दिला.

यावेळी केकेआरची धावसंख्या दोन बाद 76 अशी होती, त्यानंतर यात केवळ 11 धावांची भर पडलेली असताना आपल्या अस्तित्वासाठी झगडणार्या अजिंक्य रहाणेची 44 धावांची बहुमूल्य खेळी सँटनेरने जडेजाच्या हातुन संपवली. सलामीला आलेल्या अजिंक्यने 34 चेंडूत सहा चौकार आणि एक षटकार मारत 44 धावा करत आपल्यावर कसल्याही दडपणाने फरक होत नाही असाच जणू एक संदेशही दिला.

यावेळी कोलकाता संघाने 12 व्या षटकाअखेरीस तीन गडी गमावून 87  धावा केल्या होत्या, आणि त्यांना 50 चेंडूत विजयासाठी  केवळ 45 धावा  हव्या होत्या.त्यात श्रेयस अय्यर, रसेल असे खंदे फलंदाज अजून बाकी होते. त्यामुळे विजयाचे पारडे केकेआरच्या बाजूनेच झुकलेले होते..मात्र सीएसके संघ सहजासहजी पराभव स्वीकारेल असा संघ नसल्याचे  ज्ञात असल्याने एका रोमहर्षक सामन्याची उत्सुकता सर्वांनाच होती.

मात्र कर्णधार श्रेयस आणि सॅम बिलिंग्जने आणखीन कुठलेही नुकसान न होवू देता संघाला विजयी करावे अशी अपेक्षा त्यांचे समर्थक करत असतानाच ब्रावोने आणखी एकदा चमत्कार करत बिलिंग्जची 25 धावांची आक्रमक खेळी संपुष्टात अनंत सामन्यात पुन्हा एकदा रंगत निर्माण केली खरी पण यावर्षी सर्वच फॉरमॅट मध्ये जबरदस्त फॉर्म दाखवणाऱ्या श्रेयस अय्यरने आपल्या नेतृत्वाला सार्थ ठरवत संघाला 9 चेंडु आणि 6 गडी राखुन विजयी करताना सीएसके संघाला सर्वच आघाडीवर निराश करत पराभवाचा धक्का देताना जोरदार सुरुवात केली आहे.

श्रेयसने नाबाद 19 धावा करताना संघाला विजयी केले. चेन्नई कडून ब्राव्होने 20 धावा देत तीन गडी बाद करून चांगली गोलंदाजी केली खरी,पण तुटपुंज्या असलेल्या आव्हानाला रोखण्यासाठी ती पुरेशी ठरली नाही.केकेआर संघाला अगदी सुरुवातीलाच केवळ 20 धावा देत दोन महत्वपूर्ण बळी मिळवून संघाला स्वप्नवत सुरुवात करून देणाऱ्या उमेश यादवला या मोसमातला पहिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज
5 बाद 131
धोनी 50*,जडेजा 26* रायडू 15,रॉबिन 28
उमेश यादव 20/2,
कोलकाता नाईट राईडर्स
18.3 षटकात 4 बाद 133
रहाणे 44,श्रेयस नाबाद 19,सॅम 25
ब्रावो 20/3

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.