Pune : कोथरुडकरांनी अनुभवला कबड्डीचा थरार

एमपीसी न्यूज – स्पर्धेसाठी सज्ज केलेले शानदार जीत मैदान, खेळाडूंनी दाखवलेला दर्जेदार खेळ आणि कबड्डीप्रेमींची खेळाला मिळालेली दाद यामुळे पहिल्या दिवसाच्या महापौर चषक कब्बडी स्पर्धेचा थरार कोथरुडकरांसाठी अविस्मरणीय ठरला.

महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय मॅडवरील कोथरुड येथील जीत मैदानावर सुरू असलेल्या पुरूष व महिला खुले गट कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन प्रो स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ , गट नेते पृथ्वीराज सुतार, अरविंद शिंदे, वसंत मोरे, अश्विनी लांडगे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, दिलीप वेडेपाटील, किरण दगडे पाटील, उज्वल केसकर, क्रीडा उपायुक्त संतोष भोर, सहाय्यक आयुक्त किशोरी शिंदे, संदीप कदम, नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे निरीक्षक उत्तमराव माने, स्पर्धा पंच प्रमुख मालोजी भोसले, राज्य असोसिएशनच्या उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष वासंती बोर्डे, सरकार्यवाह  मधुकर नलावडे, उपकार्याध्यक्ष राजेंद्र देशमुख, राजेंद्र आंदेकर, संदीप पायगुडे, योगिराज टकले, प्रकाश बालवडकर, शिल्पा भोसले, संदेश जाधव, शरद ढमाले, भरत शिळीमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ‘ड’ गटात अभिजित कदम संघाने कोल्हापूरच्या एकविरा कबड्डी संघावर 57-19 असा एकतर्फी विजय मिळविला. मध्यंतराला अभिजित दादा कदम संघाकडे 32-10 अशी आघाडी होती. अभिजित दादा कदम संघाच्या किरण मदने व पवन उराडे यांनी चौफेर चढाया करीत एकविरा संघाची दाणादाण उडविली. त्यांना प्रवीण तळोले यांनी चांगल्या पकडी घेत महत्त्वपूर्ण साथ दिली. कोल्हापूरच्या एकविरा संघाच्या विशाल पवार याने एकाकी झूंज दिली. तर प्रवीण नांदुडकर यांनी काही यशस्वी पकडी घेतल्या.

इ गटात झालेल्या पुरुषांच्या सामन्यात पुण्याच्या राणाप्रताप संघाने सचिनभाऊ दोडके संघावर 31-18 असा विजय मिळवित विजयी सलामी दिली. मध्यंतराला राणा प्रताप संघाकडे 21-6 अशी आघाडी होती. शुभम शेळके याने अनिल कानगुडे यांनी उत्कृष्ठ चढाया केल्या तर संकेत शेळके यांने उत्कृष्ठ पकडी घेतल्या. सचिन भाऊ दोडके संघाच्या शुभम त्रिपाठी याने चांगला खेळ केला तर सुनिल चव्हाण याने काही चांगल्या पकडी घेतल्या.

पुरूषांच्या तिसऱ्या सामन्यात छावा कोल्हापूर संघाने राकेशभाऊ घुले संघावर 41-39 अशा निसटता विजय मिळविला. मध्यंतराला छावा कोल्हापूर संघाकडे 24-22 अशी आघाडी होती. छावा कोल्हापूरच्या ऋषिकेश गावडे व परवेझ खाटीक यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कोल्हापूरच्या निलेश कांबळे याने चांगल्या पकडी घेतल्या.

_MPC_DIR_MPU_II

राकेशभाऊ घुले संघाच्या पवन कारंडे व योगेश याने चांगला प्रतिकार केला. तर गणेश सोनवणे याने चांगल्या पकडी घेतल्या.
महिलांच्या झालेल्या सामन्यात ब गटात जागृती प्रतिष्ठान संघाने मातृभूमी क्रीडा प्रतिष्ठान संघाचा 59-22 असा धुव्वा उडवीत आपल्या गटात विजय मिळविला. मध्यंतराला जागृती संघाकडे 32-14 अशी आघाडी होती. जागृती प्रतिष्ठानच्या ऋतिका होनमाने व जागृती सुरवसे यांनी चौफेर चढाया करीत मैदान गाजविले. तर वर्षा यादव हिने चांगल्या पकडी घेतल्या.
मातृभूमी संघाच्या सिजना योगी हिने चांगला प्रतिकार केला. तर दिक्षिता भोसले हिने काही पकडी घेतल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.