Laxmikant Deshmukh : कविता सादर करताना ‘सादरीकरण’ महत्त्वाचे

एमपीसी न्यूज – कविता ही आशयपूर्ण असावी लागते. भावपूर्ण असावी लागते हे खरे असले तरी त्यातील आशय, भाव हा रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी, कविता सादर करताना सादरीकरण हे अतिशय महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख (Laxmikant Deshmukh) यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आणि काव्यशिल्प पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वक्रतूंड सभागृह चिंचवड येथे आयोजित ‘रंग कवितेचे गंध शब्दांचे’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी फरांदे दंत रुग्णालय चिंचवडचे संस्थापक डॉ. माऊली फरांदे, चित्रकार जयंत श्रीखंडे तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, काव्यशिल्पचे अध्यक्ष मिलिंद जोशी, सचिव सुजाता पवार उपस्थित होते.

देशमुख (Laxmikant Deshmukh) पुढे म्हणाले, कविता सादरीकरण करताना आवाज कुठे मोठा करावा, कुठे कमी करावा, आवाजाचा जोर कसा व किती असावा हे लक्षात घेणे गरजेचे असते. या बाबी पाळल्या, तर कविता रसिकांपर्यंत यशस्वीरित्या पोहचते.

Pune News : देशप्रेम जागविण्याचे शाहिरांचे कार्य प्रेरणादायी; प्रसिद्ध तबलावादक अरविंदकुमार आझाद यांची भावना

सुरुवातीला शारदा स्तवन झाल्यानंतर दीप प्रज्वलन करुन चित्रकार जयंत श्रीखंडे यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या कविसंमेलन कार्यक्रमात प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची जन्मशताब्दी सुरु असल्याने त्यांच्या एक कवितेचे वाचन करुन कविसंमेलनाला सुरुवात झाली. अपर्णा मोहिले, विनायक कुळकर्णी, ऋचा कर्वे, बाबू डिसोझा, सुजित कदम, दिगंबर ढोकले, चंचल काळे, सुहास घुमरे, अरूण तुळजापुरकर, माधुरी मंगरूळकर, सुनिता टील्लू, जयश्री श्रीखंड़े, प्रतिभा पवार, मोहन जाधव, प्रतिमा कलंत्रे, वरुण कुलकर्णी, नंदिनी चांदवले, पल्लवी निपाणकर, डॉ. मीनल लाड, सुखदा सावरगावकर शोभा जोशी, योगिता कोठेकर आदि कवी, कवयित्रींनी सहभाग घेऊन विविध विषयांवर कविता सादर करुन रंगत आणली.

डॉ. माऊली फरांदे, जयंत श्रीखंड़े यांनीही मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवड शाखेला उत्कृष्ट शाखा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा काव्यशिल्प संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. राजन लाखे यांनी प्रास्तविक केले. संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रजनी शेठ, दत्तू ठोकळे, श्रीकांत जोशी, किशोर पाटील, विजय सातपुते यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.