Pune News : लोहगाव विमानतळ आज पासून रात्री बंद 

एमपीसी न्यूज  : लोहगाव विमानतळ सोमवार (ता. २६) पासून रात्री ८ ते सकाळी ८ दरम्यान वर्षभर बंद राहणार आहे. रात्रीची सर्व उड्डाणे दिवसा होणार आहेत. त्यानुसार विमान कंपन्यांनी वेळापत्रकात बदल केले आहेत, तर शहरातील उद्योग क्षेत्राने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हवाई दलाकडून सुरू झाले आहे. त्यामुळे सोमवारपासून पुढील वर्षी २६ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यानच उड्डाणे होतील. मात्र, सकाळी आठचे विमान असल्यास प्रवाशांसाठी विमानतळ पहाटे पाच वाजता उघडण्यात येईल आणि रात्री शेवटचा प्रवासी बाहेर पडेपर्यंत ते सुरू राहणार आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी ‘दिली. या कामामुळे विमान वाहतुकीवर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने वेळापत्रकाची रचना करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोहगाव विमानतळावरून सध्या ३४ विमानांची वाहतूक होते. रोज सुमारे ८ ते ९ हजार प्रवासी ये-जा करतात. सध्या रात्री १४ विमानांची उड्डाणे सुरू आहेत. सोमवारपासून त्यांचा समावेश दिवसाच्या वेळापत्रकात होणार आहे.

दरम्यान, विमान कंपन्यांनी वेळापत्रकाची फेररचना करण्यास सुरुवात केली आहे. त्याची माहिती प्रवाशांना एसएमएस, ई-मेलद्वारे देण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.