Lonavala : शिवराज्याभिषेक सोहळ्याला उदंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज- लोणावळा व मावळवासीयांकरिता पुरंदरे शाळा मैदानावर आयोजित केलेल्या भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रणरागिणी ग्रुप व लोणावळा विकास प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे, रणरागिणी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा मंजुश्री वाघ, लोणावळा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुकेश परमार, कार्याध्यक्ष बाळासाहेब कडू, पुणे जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, राष्ट्रवादी शहराध्यक्ष जीवन गायकवाड, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील इंगूळकर, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा पुष्पा भोकसे, मुख्याधिकारी सचिन पवार, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या महानाट्यांचे उदघाटन करण्यात आले.

लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र प्रस्तुत व शिवदुर्ग मित्रचे प्रवीण देशमुख लिखित निर्मित व दिग्दर्शित या महानाट्याचे रणारगिणी ग्रुप व लोणावळा विकास प्रतिष्ठान यांनी मावळ व लोणावळावासीयांकरिता मोफत आयोजन केले होते. महानाट्यात सहभागी असलेले स्थानिक एक हजार कलाकार, शंभर फुटाचा भव्य रंगमंच, घोडे, उंट, बैलगाड्या, जिवंत तोफा, आक्रमक लढाया, नगारखाना, मेघडंबरी हे सर्व पाहण्याकरिता व छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा क्षण पाहण्याकरिता नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.

दहा हजारांहून अधिक नागरिकांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. ती पूर्ण भरुन नागरिक महानाट्य पाहण्याकरिता चौफेर उभे होते. लोणावळा शहर पोलिसांनी महानाट्याच्या ठिकाणी तसेच शहरात चोख बंदोबस्त नेमून कायदा व सुव्यवस्था राखत शहरातील वाहतूक कोंडी रोखण्याकरिता योग्य नियोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.