Lonavala : शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद; खासगी वाहनांची कसून तपासणी

एमपीसी न्यूज : लोणावळा शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच शहरात येणार्‍या प्रत्येक खासगी प्रवासी वाहनांची वलवण व खंडाळा येथिल प्रवेशद्वारावर कसून तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी लोणावळा शहर पोलीस व लोणावळा नगरपरिषद यांच्याकडून याकरिता चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.

खासगी वाहनांमधून येणारे प्रवासी हे कोठून आले, कोठे जाणार, त्यांच्याकडे प्रवास परवाना आहे का यासह त्यांची थर्मल मशिनद्वारे तपासणी सुरू करण्यात आली आहे. याकरिता मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वलवण व खंडाळा येथे चेकपोस्ट नाके तयार करण्यात आले आहे.

वाहनांचा वेग कमी करण्याकरिता याठिकाणी लोखंडी ड्रम लावण्यात आले आहेत. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी या चेकपोस्टची पाहणी केली.

मावळ तालुक्यात तळेगाव व माळवाडी येथे कोरोना रुग्ण सापडले आहेत. लोणावळा शहरात अजूनही कोरोनामुक्त आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण नसले तरी मुंबई, पुण्यासह बाहेर गावावरून येणारे नागरिक हे शहराकरिता त्रासदायक ठरू शकतात, याकरिता लोणावळा शहराच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर चेकपोस्ट नाके तयार करत याठिकाणी येणारी सर्व वाहने व वाहनांमधील प्रवासी यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

तपासणी केलेल्या वाहनांच्या नोंदी घेतल्या जाणार असल्याने शहरात बाहेरील कोणालाही मुक्तसंचार करता येणार नाही. तिसर्‍या लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिली गेल्याने नागरिक घराबाहेर पडले आहेत.

ज्यांना मुंबई, पुणे प्रवास करायचा आहे त्यांनी द्रुतगती मार्गाने जायचे आहे तसेच सर्व अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

शहरातील चेकपोस्ट नाक्यांमुळे कोणालाही सहजासहजी लोणावळ्यात प्रवेश करता येणार नाही. परवाना घेऊन आलेल्या नागरिकांच्या नोंदी घेऊन त्यांना क्वारंटाईन केले जाणार आहे, जे नागरिक विनापरवाना प्रवेश करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सक्तीचे क्वारंटाईन केले जाणार आहे.

लोणावळा शहराला कोरोनामुक्त ठेवण्याकरिता प्रत्येक नागरिकांनी नियमांचे पालन करत जागृत रहाणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.