Loni Kalbhor Crime News : हप्ता भरण्यास सांगितल्याने कर्जदाराकडून फायनान्स मॅनेजरचा खून

एमपीसीन्यूज : थकित कर्जाचा हप्ता भरण्यास सांगितल्यामुळे एका कर्जदाराने बजाज फायनान्सच्या मॅनेजरचा खून केला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

रवींद्र प्रकाश वळकुंडे (वय 28) असे खून झालेल्या फायनान्स मॅनेजरचे नाव आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी राहुल लक्ष्मण गाढवे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमोल भीमराव जोगदंड यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, उरळीकांचन परिसरातील एका इमारतीत बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. आरोपी राहुल गाढवे याने बजाज फायनान्समधून पर्सनल लोन घेतले होते. या खर्चाचे हप्ते त्वरित भरावेत यासाठी मयत रवींद्र वळकुंडे यांनी आरोपीकडे पाठपुरावा केला होता.

याच कारणावरून आरोपीने मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कार्यालयात येऊन रवींद्र वळकुंडे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने वळकुंडे यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.