Lonikand : बिवरी गावात सशस्त्र दरोडा; महिलांना मारहाण करून 16 लाखांची लूट

एमपीसी न्यूज –  लोणीकंद परिसरात असलेल्या बिवरी गावात एका घरात मध्यरात्री (Lonikand) दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी महिलांना शस्त्राचा धाक दाखवून 16 लाख 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लुटली.

याबाबत प्रशांत विलास गोते (वय 40 , रा. बिवरी, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत गोते आणि कुटुंबीय मंगळवारी रात्री जेवण करून झोपले. मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास सात ते आठजण त्यांच्या घराजवळ आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. घराचा दरवाजाा कटावणीने उचकटण्यात आल्याने गोते कुटुंबीय झोपेतून जागे झाले. दरोडेखोर गोते कुटुंबीयांच्या घरात शिरले.

गोते कुटुंबीयाला चाकू, तसेच तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविण्यात आला. दरोडखोरांनी खोलीतील कपाट उचकटून  पाच लाखांची रोकड आणि दागिने काढून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी गोते कुटुंबातील महिलांच्या गळ्याला चाकू लावून गळा चिरण्याची धमकी देत अंगावरील दागिने काढून घेतले व  गोते यांच्या बहिणीला मारहाण केली व आईला मारहाण केली. दरोडा टाकल्यानंतर चोरट्यांनी पसार होताना पोलिसांशी संपर्क साधू नये म्हणून गोते कुटुंबातील सर्वांचे मोबाइल संच फोडले. अधिक तपास लोणीकंद पोलिस करत (Lonikand)  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.