आषाढस्य प्रथम दिवसे….

(चिन्मया इनामदार)

एमपीसी न्यूज- आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. महाकवी कालिदास रचित मेघदूत काव्याप्रमाणे ‘आषाढस्य प्रथम दिवसे’. या निमित्त महाकवी कालिदास या वैदर्भीय कवीच्या जीवनप्रवासावर चिन्मया सुभाष इनामदार हिने टाकलेला एक दृष्टिक्षेप. महाकवी कालिदास यांच्या जयंतीनिमित्त चिन्मया सुभाष इनामदार हिने कालिदास आणि कालिदास यांची रचना याबद्दल सांगितले आहे. चिन्मया मागील पाच वर्षांपासून अखिल भारतीय संस्कृत पाठांतर स्पर्धेत सहभाग घेत आहे. तिने रघुवंशम व कुमारसंभवम या दोन महाकाव्यांचे पाठांतर केले आहे.

संस्कृत वाङ्मय म्हणजे उत्तमोत्तम नाटके काव्य शास्त्रीय दार्शनिक प्रबंधनाचा अमूल्य खजिनाच आहे. अशा या समृद्ध संस्कृत साहित्याला स्वतंत्र आणि मोलाची देणगी देणारा महाकवी म्हणजे कालिदास. त्यांनी आपल्या साहित्यात जीवनातील सौंदर्याचे दर्शन घडवले आहे. माणसाला आनंद देणाऱ्या उदार, आकर्षक आणि निस्वार्थी वर्णनाचा मानदंड त्याच्या लेखनातून दिसतो. त्याची व्यक्तिचित्रणे हुबेहूब आणि हृदयस्पर्शी आहेत. थोड्या शब्दात फार मोठा अर्थ प्रगट करण्याचे सामर्थ्य या कवीच्या ठिकाणी आहे, असे मला वाटते.

त्याच्या लिखाणातून लोकांना उदात्त जीवनाची दिशा कळते. कालिदासाचे ग्रंथ म्हणजे विचारवंतांसाठी, सर्वसामान्य वाचकांसाठी बौद्धिक मेजवानीच आहे. आणि याच मेजवानीचा आस्वाद रघुवंशम व कुमारसंभवम् या महाकाव्याद्वारे मी घेत आहे. केवढे ते शब्दसामर्थ्य, भाषाशैली, शब्दातील माधुर्य, उपमा, अलंकार या सर्वच गुणवैशिष्ट्यांनी हे महाकाव्य ओतप्रोत भरली आहेत.

महाकवीला आवश्यक अशी स्वतंत्र प्रतिभा कालिदासांना लाभली होती. जीवनातील सौंदर्याचे आणि आदर्श याचे प्रस्थापन त्याच्या साहित्यात दिसून येते. राजवाड्यातील समृद्धी, श्रीमंती, थाटाची विलासी जीवन तसेच आश्रमातील शांतता, साधेपणा, समाधानी जीवन त्याने सारख्याच उत्कटतेने रेखाटले आहे. रघुवंशम सारख्या महाकाव्यातून रघुची संपूर्ण वंशावळ डोळ्यासमोर उभी राहते. त्या वेळचा थाट, राज्यकारभारत नैसर्गिक सौंदर्य, तर कुमारसंभवम् या महाकाव्याच्या सुरुवातीला त्या हिमालयाचे दर्शन घडते. पार्वतीच्या तपश्चर्येचे वर्णन वाचताना कालिदासाचे भौतिक संस्कृतीवर किती प्रेम होते हे लक्षात येते. शंकराला जिंकण्याचा निश्चय करणारी पार्वती हुबेहूब आपल्या समोर उभी राहते. मेघदूताच्या रूपाने कालिदासाची लेखणी दाम्पत्य जीवनातील सौख्याचे क्षण ज्या सामर्थ्याने टिपते त्याच सामर्थ्याने विरही जीवांच्या वियोग व्यथाही ती हळुवारपणे रेखाटते. त्याच्या काव्यात अत्युच्च कला सौंदर्याचे भान, अतुलनीय शब्दशक्ती आणि शब्दचित्रण सुरेख संगम आढळून येतो.

संपूर्ण कालिदासाचे दर्शन त्याच्या या मौल्यवान संस्कृती साहित्यातून आपल्याला घडते. नक्कीच या साहित्य रुपये संपत्तीचे रक्षण करणे ते जाणून घेणे आपले कर्तव्य आहे. अलंकाराचा खूप सोच नाही पण सहज सुंदर उपमा योजावी ती कालिदासानेच. म्हणूनच टीकाकार म्हणतात उपमा कालिदासस्य.

याचा प्रत्यय गेली काही वर्षे रघुवंशम व कुमारसंभवम् मुखोद्गत करण्याच्या माध्यमातून मी घेत आहे. त्याच्या भाषा माधुर्य, भाषाशैलीने मला जणू काही भुरळ घातली आहे. म्हणूनच सातत्याने हा अभ्यास मला करावासा वाटला दोन ओळी लिहायच्या तर शब्द सुचत नाहीत. यावरून मी विचार करते. तेव्हा मला कालिदासाच्या अफाट प्रतिभाशैलीचे आश्चर्यही वाटते. मग लक्षात येते की, म्हणूनच का देश काळाच्या मर्यादा ओलांडून लोकप्रिय झाला आहे कालिदास. दुसरा कवी अद्याप बोटावर मोजता आलेला नाही आणि अनामिका त्याच्या नावाने सार्थ ठरली आहे. अशा या श्रेष्ठ कवी कुलगुरूला माझे त्रिवार वंदन.

चिन्मया सुभाष इनामदार
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like