Maharashtra Bandh Update: महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महा विकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

महा विकास आघाडीने पुकारलेल्या या महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यासह आघाडीतील घटक पक्ष आणि विविध संघटना सहभागी होणार आहेत. यासाठी सरकारकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चाचे आयोजन केले आहे. तर भारतीय जनता पक्षाने मात्र या बंदला विरोध केला आहे.

दरम्यान बंदच्या कालावधीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पुणे शहरात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. या पोलिस बंदोबस्तात दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त, आठ सहाय्यक पोलीस आयुक्त, 13 पोलीस निरीक्षक, 76 सहाय्यक पोलीस निरीक्षक 87 पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह तीन हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.