Pune News : लखीमपूर येथील घटनेचा निषेध, पण दुकाने सुरू ठेऊ – पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. शेतकरी हे उत्पादकाबरोबरच ते विक्रेते असल्याने ते आमचे व्यवसाय बंधूच आहेत. त्यामुळे सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बंदमध्ये आम्ही सहभागी न होता काळ्या फिती लावून हल्ल्याचा निषेध नोंदवणार आहोत, अशी भूमिका पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे घेण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

कोरोना काळात व्यापार बंद राहिल्याने खूप मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे व्यवसाय बंद ठेवणं आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. परंतु, शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांना ठार मारण्याच्या प्रकाराचा संघटनेच्या वतीने आम्ही निषेध करतो आहोत.

शेतकरी आंदोलनातील उत्तर प्रदेशातील मृत शेतकऱ्यांना संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत असून या हल्ल्याचा निषेध म्हणून सोमवारी काळ्या फिती लावून आम्ही व्यवसाय सुरू ठेवणार आहोत, असेही सचिन निवंगुणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.