Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,153 रुग्णांची वाढ, बाधितांची संख्या 17.84 लाखांवर

एमपीसी न्यूज – राज्यात आज, सोमवारी 4 हजार 153 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17 लाख 84 हजार 361 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 81 हजार 902 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 16 लाख 54 हजार 793 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज दिवसभरात 3 हजार 729 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्याचा रिकव्हरी रेट 92.74 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 46 हजार 653 रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यूदर 2.61 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 2 लाख 81 हजार 543 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी 17 लाख 84 हजार 361 एवढे नमुने सकारात्मक आले आहेत. राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 17.35 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 5 लाख 17 हजार 711 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 6 हजार 524 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या वतीने नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. ही टेस्ट किमान 4 दिवस आधी केलेली असावी, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्टचा अहवाल ज्या प्रवाशांसोबत नसेल त्यांना विमानतळावर आल्यानंतर ती टेस्ट करावील लागेल. विमानतळांनी यासंदर्भातले टेस्टिंग सेंटर्स उभारले पाहिजेत. या चाचणीचे शुल्क प्रवाशांकडून घेण्यात येईल.अशाच प्रकारची नियमावली रस्ते मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.