Maharashta : बेळगाव, निपाणी, बिदरसह 865 गावं महाराष्ट्राचीच; कर्नाटकविरोधात सीमावादाचा ठराव एकमताने मंजूर

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. या सीमावादावर आता शिंदे-फडणवीस सरकारने विधानसभेत ठराव मांडला. (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत ठरावाचं वाचन करण्यात आलं. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा ठराव तत्काळ मंजूर केला. सीमावादाचा हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्रातील एक इंचही जमीन कर्नाटकात जाणार नाही, असं या ठरावात मांडण्यात आलं आहे.

सोमवारी विधानसभेत विरोधकांनी सीमा प्रश्नी सरकारकडून ठराव सादर न झाल्याने मोठा गदारोळ झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमा प्रश्नी ठराव सोमवारी अथवा मंगळवारी सादर होईल असे म्हटले होते. त्यानंतर आज विधानसभेत ठराव सादर करण्यात आला.

राज्य सरकारने सादर केलेल्या ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दुरुस्ती सूचना केल्या ठरावात बेळगाव, निपाणी, भीदर या शहरांचा उल्लेख ठरावात आवर्जून करण्याची मागणी त्यांनी केली. ठराव हा आगामी काळात कायदेशीर लढाईतही महत्त्वाचा ठरू शकतो, याकडे लक्ष वेधत अजित पवार यांनी ही सूचना केली. त्याशिवाय, या ठरावातील वाक्यरचना, व्याकरण दुरूस्त करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या सूचनांचा अवलंब करण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.