Charholi News : ऐकावं ते नवल! ‘अंत्यसंस्कार’ झालेला आरोपी ‘दशक्रिया विधी’नंतर पोलिसांच्या जाळ्यात!

एमपीसी न्यूज – स्वतःच्या खुनाचा बनाव करण्यासाठी एका नराधमाने दुसऱ्या व्यक्तीचे शीर धडा वेगळे करत तसेच स्वतःचे कपडे घालून मृतदेह पुन्हा रोटर मशीनमध्ये (Charholi News) फिरवून निर्घृण खून केला आहे.  हा प्रकार चऱ्होली खुर्द येथे 16 डिसेंबरला रात्री सव्वाअकरा वाजता घडला. आरोपीचा हा बनाव हा काही प्रमाणात यशस्वी देखील झाला. आरोपीचे अपघाती निधन झाल्याचे मानून कुटुंबीयांनी दुसऱ्याच व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यविधी करून त्यांचा दशक्रिया विधी देखील करण्यात आला, मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला आहे.

सविस्तर माहिती अशी की, स्वतःच्या खूनाचा बनाव करण्यासाठी आरोपीने दुसऱ्या व्यक्तीचे शीर धडा वेगळे केले, स्वतःचे कपडे मृतदेहाला घालून मृतदेह पुन्हा शेतातील रोटर मशीनमध्ये फिरवून निर्घृण खून केला आहे. हा प्रकार चऱ्होली खूर्द येथे 16 डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजता घडला.

सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे (वय 65 रा.चऱ्होली) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर रविंद्र भिमाजी घेनंद (वय 48) असे मयत व्यक्तीचे नाव असून निखील रविंद्र घेनंद (वय 28 रा. धानोरे, खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सोमवारी (दि.26) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याचे एक महिले सोबत प्रेमसंबंध होते. त्याला त्याच्या प्रेयसीसोबत दूर कोठे तरी जाऊन रहायचे होते. यासाठी त्याला त्याच्याच मृत्यूचा बनाव बनवायचा होता. यासाठी त्याने महिले सोबत मिळून रविंद्र घेनंद यांना विश्वासात घेऊन सुभाष ज्ञानोबा थोरवे यांच्या शेतात बोलावले. कोयत्याने त्यांचे मुंडके कापले, मृतदेहाच्या अंगावर स्वतःचे कपडे घातले. तसेच शेतात काम करावयाच्या रोटर मशीनमध्ये मृतदेह घालून तो फिरवला व हा अपघात असल्याचा बनाव केला. तसेच मृतदेहाचे मुंडके, कोयता, व अंगावरचे कपडे लपवून ठेवत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

Maharashta : बेळगाव, निपाणी, बिदरसह 865 गावं महाराष्ट्राचीच; कर्नाटकविरोधात सीमावादाचा ठराव एकमताने मंजूर

गावात झाला दहाव्याचा कार्यक्रम – Charholi News

आरोपीचा बनाव हा एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच होता. त्यात तो काही प्रमाणात यशस्वी देखील झाला. थोरवे कुटुंबीयांनी मृतदेह शेतात पाहिला तेव्हा त्याला मुंडके नव्हते पण अंगावर सुभाष उर्फ केरबा याचे कपडे होते. त्यामुळे त्यांना केरबा यांचेच अपघाती निधन झाल्याचे त्यांनी मान्य केले. यावरून अंत्यविधी करून त्यांचे दहावे देखील घरच्यांनी घातले. मात्र, आरोपी दुसऱ्या गावात पोलिसांच्या हाती लागल्याने थोरवे कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. आळंदी पोलिसांनी आरोपीचे पितळ उघडे पाडत आरोपीला अटक केले असून आरोपी सुभाषवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. आळंदी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे हे पुढील तपास करत आहेत.

वयाच्या 65 व्या वर्षी प्रेमसंबंधासाठी असा निर्घृण खून करत त्याचा एवढा मोठा बनाव कसा केला? याबाबत परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.