Maharashtra Police : राज्यातील महिला पोलीस ‘ऑन ड्युटी आठ तास’

एमपीसी न्यूज – राज्य पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला पोलिसांना आता बारा तास नाही तर केवळ आठ तास ड्युटी लावली जाणार आहे, याबाबत पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी माहिती दिली आहे.

पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कौटुंबिक जबाबदारी देखील पार पाडावी लागते. अनेक वेळेला सण-उत्सव तसेच इतर कारणांसाठी लावण्यात आलेले बंदोबस्त, गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात 12 तासांपेक्षा अधिक काळ कर्तव्य बजावावे लागते. यामुळे महिला पोलिसांच्या कौटुंबिक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले होते.

याची दखल घेऊन मागील महिन्यात (29 ऑगस्ट) नागपूर पोलीस आयुक्तांनी नागपूर शहरातील महिला पोलिसांना आठ तासांची ड्युटी सुरू केली. या निर्णयाचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी कौतुक केले तसेच राज्य पोलीस दलातील अन्य घटकांनी देखील याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आवाहन महासंचालकांनी केले होते.

दरम्यान, पुणे शहर, पुणे ग्रामीण ,अमरावती, नवी मुंबई इत्यादी ठिकाणी महिलांच्या कामाचे तास कमी करण्यात आले होते. यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्य पोलीस सेवेतील सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आठ तासाची ड्युटी देण्यात येणार असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे महिला पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दहा वर्षांपूर्वी आठ तास ड्युटीचा पहिला प्रयोग भोसरी पोलीस ठाण्यात

महिला पोलिसांना आठ तासांची ड्युटी देण्याचा राज्यातील पहिला प्रयोग पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलीस ठाण्यात राबविण्यात आला. या प्रयोगाची सुरुवात 20 नोव्हेंबर 2011 रोजी झाली. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले होते. तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी हा प्रयोग यशस्वीरीत्या राबवला होता. मधल्या काळात हा प्रयोग बारगळला, त्यानंतर दहा वर्षांनी संपूर्ण राज्यस्तरावर याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.