Maharashtra : राज्यातील 800 पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर; पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सात जणांचा समावेश

एमपीसी न्यूज – राज्यातील अपर महासंचालक, अपर आयुक्त, दोन उपमहानिरीक्षक, 24 उपायुक्त, अधीक्षक यांच्यासह 800 पोलिसांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त हे सन्मानचिन्ह प्रदान केले जाणार आहे. (Maharashtra) यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबाबत पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी माहिती देत सर्व सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गात उत्तम कामगिरी आणि उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक, पोलीस पदक, पोलीस शौर्य पदक दिले जाते. या पोलिसांना पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह अथवा सन्मानचिन्ह दिले जाते. सन 2022 या वर्षाकरिता राज्यातील 800 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण सेवा, मिळालेले रिवार्ड, कामाची श्रेणी आदि निकषांच्या आधारे हे पदक दिले जाते.

अपर पोलीस महासंचालक संजयकुमार वर्मा, मुंबई शहरचे अपर पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपमहानिरीक्षक अभिषेक त्रिमुखे, सुधीर हिरेमठ या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक फौजदार सुहास पाटोळे, सहायक फौजदार बिहीषण कन्हेरकर, पोलीस नाईक खुशाल वाळुंजकर, पोलीस शिपाई रणधीर माने यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. आयुक्तालयातील सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अभिनंदन केले.

Pune : सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथील शाळांना राष्ट्र आणि धर्म यांची चेतना जागृत करणारे ग्रंथ भेट

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अभिलेख अद्ययावत ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी संघटीत गुन्हेगारी विरोधात चांगली कामगिरी केली. सुरेश पुजारी, रवी पुजारी यांच्यासारख्या गुन्हेगारांवर त्यांनी कारवाई केली आहे.

पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी पिंपरी येथील खून प्रकरणात (Maharashtra) दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेतला. क्रिकेट बेटिंग प्रकरणी आंतरराष्ट्रीय बुकींना पकडून त्यांनी कारवाई केली आहे. तसेच इतर गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर त्यांनी कारवाई केली आहे.

सहायक फौजदार सुहास पाटोळे यांनी संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गुन्हेगारांच्या टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

सहायक फौजदार बिभीषण कान्हेकर यांनी दरोडा, घरफोडी अशा गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना पकडले. यामध्ये काही गुन्हेगार परराज्यातून देखील पकडण्यात आले. (Maharashtra) काही गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची देखील त्यांनी उकल केली आहे.

रेखाचित्रकार पोलीस नाईक खुशाल वाळूंजकर यांनी रेखाटलेल्या रेखाचीत्राच्या आधारे अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. फरार आरोपींच्या वर्णनावरून ते गुन्हेगारांचे हुबेहूब चित्र रेखाटतात.

कुस्तीपटू पोलीस शिपाई रणधीर माने यांनी कुस्तीत राज्यस्तरावर विविध पदके मिळवली आहेत. विविध स्पर्धांमध्ये त्यांनी कुस्ती प्रकारात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.