Pune : ‘महाराष्ट्रातील राजकारण’ पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

लोकमित्र प्रकाशन व पॉलिटिकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस ब्युरो यांच्याकडून पुस्तकाची निर्मिती 

एमपीसी न्यूज – लोकमित्र प्रकाशन व पॉलिटिकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो’च्या वतीने निर्मित महाराष्ट्रातील राजकारण (लोकप्रतिनिधी  निवडणूक मार्गदर्शक)’ या पुस्तकाचे प्रकाशन आज शनिवारी (दि.4) बालगंधर्व रंगमंदीर येथे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती  ना.रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माजी महापौर मा. अंकुश काकडे, मा. विजय कोलते, अध्यक्ष, आचार्य अत्रे विकास  प्रतिष्ठान, लेखक चंद्रकांत भुजबळ उपस्थित होते.

लोकमित्र प्रकाशन व पॉलिटिकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस ब्युरो’च्या वतीने निर्मित महाराष्ट्रातील राजकारण (लोकप्रतिनिधी  निवडणूक मार्गदर्शक)’ या पुस्तकाचे प्रकाशन व पुरंदर मित्र मंडळ रौप्य महोत्सवी स्नेह मेळावा समारंभाचे आयोजन पुरंदर मित्र  मंडळ व आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर यांनी केले होते. यावेळी पुरंदरवासियांचा स्नेहमेळाव्यात सासवड नगरपालिकेचे माजी  नगराध्यक्ष जयसाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक, मनोगत आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष  विजय कोलते यांनी केले.

याप्रसंगी शरद पवार म्हणाले की, दुष्काळी भागावर मात करून नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात पुरंदरवासीय नेहमीच  आघाडीवर राहिलेले आहेत. कठीण परिस्थितीत शेती बरोबरच व्यवसायात देखील नावलौकिकता प्राप्त केली आहे. अनेकांनी आपले  कर्तृत्व सिद्ध केले आहे. जयसाहेब पुरंदरे यांनी सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पदाचा विकासात्मक वापर करून उद्योग  व्यवसायांना चालना देऊन सामाजिक कार्यात नेहमी योगदान दिले आहे असे सांगून त्यांचे कौतुक केले तसेच लोकमित्र प्रकाशनचे  पुस्तक विशेषतः युवकांना मार्गदर्शक ठरेल असे यावेळी सांगितले. तसेच पुरंदर तालुक्याने मला नेहमी मतांच्या माध्यमातून  भरभरून प्रेम दिले असे सांगून मित्र मंडळ रौप्य महोत्सवी स्नेह मेळाव्यास उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

विधानपरिषदेचे  सभापती ना.रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रकाशन प्रसंगी त्यांनी आपल्या पुस्तकाचीच सर्वत्र चर्चा आहे. चांगली उपयुक्त माहिती असल्याचे सांगितले. तसेच जयसाहेब पुरंदरे यांचे कौतुक करून त्यांना देखील शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन गौरव कोलते यांनी केले.

राजकीय विश्लेषक व अभ्यासक चंद्रकांत भुजबळ लिखित पुस्तक महाराष्ट्रातील राजकारण (लोकप्रतिनिधी निवडणूक मार्गदर्शक)’ हे  पुस्तक लोकमित्र प्रकाशन व पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो’च्या वतीने निर्मित केलेले आहे.  या पुस्तकाची एकूण  पृष्ठसंख्या 560 (सर्व पाने रंगीत) असून किंमत 1500/- रुपये आहे. सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी करिता निवडणूक  मार्गदर्शनपर उपयुक्त पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील मतदारसंघ इतिहास, राजकीय सद्यस्थिती, मतदारसंघ निहाय  जातीय प्रमाण/प्रभाव, मागील निवडणूक निकाल व 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांचे सविस्तर निकाल, मतदारसंघ निहाय  मतदारांचे वयोगट, कुटुंबप्रमाणे वर्गीकरण व विश्‍लेषण, निवडणूक संबंधीचे कायदे व माहिती, आरक्षण, मतदारसंघ नकाशा, रचना,  मतदारसंख्या आदी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुक पक्ष निहाय अद्यावत निकाल, तालुका व स्थानिक स्वराज्य संस्था व  जिल्ह्याप्रमाणे धर्मनिहाय लोकसंख्येचे अधिकृत प्रमाण, निवडणुकांसाठी इतर उपयुक्त माहितीचे विश्‍लेषण आदी महत्वपूर्ण  माहितीचे लेखन करण्यात आले आहे.

सदरील पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा धारक विद्यार्थी, सामाजिक व राजकीय परीस्थितीचे  अभ्यासक, विश्लेषक, संशोधक संस्था, शिक्षण संस्था, शिक्षक, प्रसारमाध्यमे, पत्रकार, राजकीय पक्ष व सामाजिक संस्था, सर्व  स्तरातील लोकप्रतिनिधी, संख्याशास्त्र व राज्यशास्त्र विभाग प्राध्यापक/विद्यार्थी/संशोधक, तसेच ग्रंथालय व अभ्यासिका यांच्यासाठी  उपयुक्त आहे. निवडणूक विषयक नियमांची विस्तृत माहिती सुलभ भाषेत देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.