Manobodh by Priya Shende Part 39 : मनोबोध भाग 39 – जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 39 

 

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे 

 

जयाचेनि योगे समाधान बाणे 

 

तयालागि हे सर्व चांचल्य दीजे 

 

मना सज्जना राघवी वस्ती कीजे 

या श्लोकामध्ये पण समर्थ सांगताहेत मनाला, की बाबा रे, तू राघवा ठायी वस्ती कर. म्हणजेच त्याच्या हृदयात राहा. त्याच्यात सामावून जा. त्याची भक्ती कर. त्याच्या चरणाशी लीन होऊन त्याला शरण जा. तू फक्त त्याचाच विचार कर. बाकी वावगं काही बोलूच नकोस. राम नामाशिवाय जे बोलशील ती, सगळी व्यर्थ बडबड आहे.  तुझ्या अंतर्मनात त्याचंच नाव राहु दे. मुखात पण तेच नाव राहू दे.

आता राघवाची वस्ती का धरायची, कारण माणसाला काही स्वार्थ असल्याशिवाय, दिसल्याशिवाय तो कोणाचे सल्ले कशाला मानेल?  एखाद्या गोष्टीचे महत्व कळल्याशिवाय किंवा आपला काय फायदा आहे हे समजल्याशिवाय तो स्वतःत काही बदल करून घेत नाही.  तर समर्थ त्याचे उत्तर पहिल्या दोन चरणात देत आहेत.  ते म्हणताहेत की, ह्या परमेश्वराचं वर्णन वेद, शास्त्रं, पुराणात करून ठेवले आहे. तो परमेश्वर हा अनादि अनंत असा आहे. अवर्णनीय आहे.

देवांची लीला, पराक्रम, स्तुति हे सगळं वेद, शास्त्रं पुराणात लिहून ठेवले आहे.  आपण त्याचा अनुभव तर घेतला पाहिजे. पुढे समर्थ म्हणताहेत की, आपलं चित्त, जीव हे जेव्हा परमेश्वराशी एकरूप होते.  जिवाशिवाची भेट होते.  रामरूप होते.  आत्मारामाची एकरूप होते, तेव्हा जीवाला समाधान मिळतं.  नुसतं मिळत नाही तर ते बाणतं.  म्हणजे आपल्या मध्ये मुरतं.  जीव आत्मरूप झाला तरच, त्याला खरं समाधान, खरं सुख हे प्राप्त होतं.  आणि हे खरं सुख मिळायला जिवाशिवाची भेट होणे गरजेचे आहे. ज्याला आत्मिक समाधान मिळतं ते, परमात्म्याशी एकरूप झालेले असतात.  सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन पोचतात.  ते संसारिक सुखाच्या सुखाच्या मागे लागत नाहीत.  माझं घर, बंगला, गाडी, कीर्ती, सुखाच्या मागे धावत नाहीत.  संसारातल्या चिंतांनी ग्रासून जात नाहीत.  ते फक्त कायमस्वरूपी असलेलं समाधान बाणवतात.  तात्पुरत्या सुखसोई, आनंदाच्या मागे जात नाहीत.  तर असं हे कायमस्वरूपी चिरंतन सुख आणि समाधान हवं असेल, तर काय करावं, हे सांगताना समर्थ म्हणताहेत की “तयालागि हे सर्व चांचल्य दीजे”.

तयालागि म्हणजे परमेश्वराला, हे सर्व दीजे म्हणजे, सगळं देऊन टाका, अर्पण करा. काय अर्पण करा तर मनाचं चांचल्य म्हणजेच चंचलता. त्या परमेश्वराला तुमची चंचलता द्या.  म्हणजे तुमची चित्तवृत्ती शांत होईल.  मनाला सगळ्यात बाधित कोण करतं तर, ही चंचलता.  एकदा का आपलं सुख दुःख त्याला अर्पण केलं म्हणजे, आपोआपच आपण सुखदुःखाच्या कल्पनेतून मुक्त होतो.  मन स्थिर असेल तर भगवंत भक्तीत रममाण होईल.  मन चंचल असेल तर, त्याची भक्ती- उपासना होईल कशी? त्यामुळे समर्थ म्हणताहेत की चंचलता देवाला अर्पण कर.  भगवंत चरणी लीन हो. म्हणजे समाधान लाभेल.

समाधान म्हणजे अशी पायरी की, आणखी काही मिळावं, अशी इच्छा न होणे.  या पायरीला मन शांत, स्थिर होऊन ते परमेश्वराशी एकरूप झालं, म्हणजे परमार्थ साधून उन्नतीचा मार्ग खुला होईल. असं समर्थ सांगताहेत

जय जय रघुवीर समर्थ 

प्रिया शेंडे

मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.