Pimpri: मास्क खरेदीत गैरव्यवहार म्हणजे मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार; महासभेत विरोधकांचा हल्लाबोल

mask scam in pcmc blame by opponents on bjp in pimpri chinchwad

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या आपत्तीत मास्क खरेदीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी इष्टापत्ती साधली आहे. मास्क खरेदीत गैरव्यवहार म्हणजे मयताच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी महासभेत केला.

मास्कचा दर्जा, किंमत याची चौकशी करावी. फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणीही त्यांनी केली.

त्यावर खुलासा करताना मास्कच्या दर्जाची चौकशी केली जाईल. दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने उपाययोजना म्हणून नागरिकांना मास्क वितरीत करण्याचे ठरविले होते.

शहरातील बचत गटांना काम देण्याच्या नावाखाली सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील काही पदाधिकारी, नगरसेवकांच्या 13 बचत गट आणि संस्थांना काम दिले होते.

याप्रकरणाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. विषय पत्रावर देहूगाव परिसरातील नागरिकांना मास्क वाटप करण्याचा विषय होता.

या विषयाच्या अनुषंगाने विरोधीपक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने गुरुवारी (दि.3) महासभेत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, देहूगाव परिसरातील नागरिकांना मास्क देण्याचा विषय आहे. हा विषय मावळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुचविला आहे.

मात्र, निकृष्ट दर्जाचे मास्क देणार असाल तर नको आहे. याऐवजी आम्ही सदस्य वर्गणी काढून मास्क देऊ. बचत गटांना काम देऊ असे सांगितले होते.

पण 13 संस्थाकडून खरेदी केली आहे. या 13 संस्थाच शहरात होत्या का? या प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी.

राष्ट्रवादीच्याच माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या, मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी. मास्कचा दर्जा, किंमत याची चौकशी व्हायला हवी. गुन्हे दाखल करायला हवेत.

माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, निकृष्ट दर्जाचे मास्क कोणी पुरविले असतील. तर त्या संस्था, बचत गटांवर कारवाई करायला हवी.

त्यांना पुढील काळात महापालिकेने कोणतेही मदत करू नये. अशा संस्थांना काळ्या यादीत टाकायला हवे.

माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, दोन ते तीन रूपयांना तयार होणारा मास्क दहा रूपयांना खरेदी केला. मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे.

यासाठी वापरलेले कापड हे निकृष्ट दर्जाचे आहे. असे मास्क वाटूनही काहीही फायदा झालेला नाही. यामुळे ठेकेदारांची घरे भरली आहेत. आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित संस्थाकडून वसूली करावी.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, नागरिकांना मास्क द्यायचा होता. तर, चांगला द्यायला हवा होता. टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. मास्कचा दर्जा आणि मापात पाप कोणी केले असेल तर तपासण्याची गरज आहे.

बचत गटांच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी काही ठेकेदारांनाही काम दिल्याचे दिसून येत आहे. याची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी.

त्यांनतर खुलासा करताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, मास्क खरेदीविषयी आक्षेप घेतले आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येईल. दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.