Maval Corona Update: विवाहसोहळ्यासाठी धुळ्याला गेलेले तळेगावचे 4 जण पॉझिटिव्ह; ओळकाईवाडीतील रुग्णाचा मृत्यू

Maval: 4 positive people from Talegaon who went to Dhule for wedding, died at Olakaiwadi तळेगावात आजपर्यत 13 कोरोना रुग्ण सापडले असून यापैकी दोन जण कोरोनामुक्त झाले असून 11 सक्रिय रुग्ण आहेत.

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तळेगाव येथे आज (दि.17) सकाळी नव्याने चार कोरोना रुग्ण वाढल्याने मावळातील कोरोना रुग्णांची संख्या 45 झाली आहे. यापैकी वलवण येथे राहणार्‍या महिलेचा मंगळवारी दुपारी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तर ओळकाईवाडी येथे राहणार्‍या डॉक्टरांचा आज (दि.17) सकाळी पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

मावळ तालुक्यात आज अखेर 26 सक्रिय कोरोना रुग्ण असून 17 जण बरे झाले आहेत. मंगळवारी तळेगाव येथील राव कॉलनीमध्ये राहणार्‍या दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

आज पुन्हा चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज सापडलेले रुग्ण हे एका विवाह सोहळ्याकरिता धुळ्याला गेले होते. ते ज्यांच्यासमवेत लग्नाला गेले होते. त्या धुळे येथील कुटुंबाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तळेगावातील त्यांच्या संर्पकातील कुटुंबाची तपासणी केली असता त्यांचे देखील अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

तळेगावात आजपर्यत 13 कोरोना रुग्ण सापडले असून यापैकी दोन जण कोरोनामुक्त झाले असून 11 सक्रिय रुग्ण आहेत.

विनाकारण घराबाहेर जाऊ नका, लांबचा प्रवास करू नका असे आवाहन शासन व प्रशासन करत असताना देखील या सुचनांकडे कानाडोळा केला जात असल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

महिनाभरापूर्वी कोरोनामुक्त असलेल्या मावळ तालुक्यात कोरोनाचा फास घट्ट होऊ लागला असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

मावळ तालुक्यातील लोणावळा, कामशेत, वडगाव, तळेगाव, देहूरोड, पवनानगर, टाकवे बु येथील बाजारपेठा बघितल्यास तेथे व्यावसायकांना कसलेच सोयरसुतक नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम बासनात बसवून याठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरु आहेत. प्रशासनाकडून देखील कारवाई होत नसल्याने नागरिक‍ांचा मुक्त संचार सर्वत्र सुरु आहे.

कोरोनाचे रुग्ण शहरी व ग्रामीण दोन्ही भागात सापडत असल्याने नागरिकांनी स्वंयशिस्त पाळणे महत्वाचे आहे.

कोरोना रोखण्याकरिता महत्वाच्या कामाखेरीज घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, चेहर्‍यावर मास्क लावावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सतत हात धुवावे असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके, तहसिलदार मधुसूदन बर्गे, आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.