Maval : मोठी बातमी! सात वर्षीय मुलीच्या अपहरण, खून प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

आरोपीच्या आईला सात वर्षांचा कारावास

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील (Maval) कोथुर्णे गावात सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली. या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज (शुक्रवारी, दि. 22) शिवाजीनगर सत्र न्यायालयात पार पडली. यामध्ये न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर त्याच्या आईला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (रा. कोथुर्णे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील सात वर्षांच्या मुलीचे 2 ऑगस्ट 2022 रोजी अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हृदयद्रावक घटनेनंतर कामशेत पोलिसांनी (Maval) तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी तेजस दळवीला अटक केली होती.

Nigdi : जातीबाबत बोलल्याने जाब विचारणाऱ्यावर कोयत्याने वार

या प्रकरणाची सुनावणी शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. आज अंतिम सुनावणी होऊन आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्याचे या सुनावणीकडे लक्ष लागले होते.

तेजस दळवी याच्या आईचा देखील या गुन्ह्यात सहभाग आढळला होता. खुनाच्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा तिने प्रयत्न केला होता. त्याबाबत तिला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.