Maval : मित्रांसोबत विसापूर किल्ल्यावर आला आणि भरकटला; किल्ल्यावरून पडलेल्या तरुणाला जीवनदान

एमपीसी न्यूज – पुण्यातून विसापूर किल्ल्यावर मित्रांसोबत फिरायला आलेला तरुण एकटा फिरत फिरत भरकटला. त्यानंतर ( Maval )तो किल्ल्यावरून पडला आणि जखमी झाला. त्याला शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि पाटण ग्रामस्थांनी रात्रीच्या अंधारात सुखरूपपणे खाली आणत जीवनदान दिले. ही घटना रविवारी (दि. 27) घडली.

अर्जुन पाटील असे त्या तरुणाचे नाव आहे. अर्जुन हा त्याचे मित्र शैलेश गायकवाड, विक्रम जाधव, उत्तरेश्वर सुरवसे (सर्व रा. पुणे. मूळ रा. मिरज सांगली) यांच्यासोबत पुण्यातून मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्यावर रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास फिरायला आला. सायंकाळी पाच वाजता अर्जुन हा त्याच्या मित्रांपासून बाजूला चालत चालत गेला आणि रस्ता चुकला.

काही वेळाने अर्जुनने मित्रांना फोन करून आपण किल्ल्यावरून पायथ्याला असलेल्या गावाकडे जात असल्याचे सांगितले. काही वेळाने पुन्हा फोन करून ‘मी पडलो आहे, माझ्या मदतीला या’ असे सांगितले. त्यानुसार त्याचे मित्र त्याला शोधत शोधत पाटण गावापर्यंत आले. मात्र अर्जुन सापडला नाही. मित्रांनी हा प्रकार गावातील तरुणांना सांगितला.

Neeraj Chopra : नीरज चोप्राने भारताला मिळवून दिले जागतिक अ‍ॅथलेटीक्सचे पहिले सुवर्णपदक

ही माहिती मिळताच गावातील तरुण अर्जुनला शोधण्यासाठी विसापूर किल्ल्यावर गेले. रात्री सव्वानऊ वाजता गावातील तरुणांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीमला फोन करून माहिती दिली. एक पर्यटक तरुण पडला असून तो जखमी झाला आहे. त्याचा हात फ्रॅक्चर झाला. मुकामार लागला असून हनुवटीला देखील मार लागल्याने दात पडले. त्याला उभा राहता येत होते, मात्र तो चालू शकत नव्हता.

शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे योगेश उंबरे, प्रणय अंभूरे, कुणाल कडू, रतन सिंग, आदित्य पिलाने, सिध्देश निसाळ, अमोल सुतार, योगेश दळवी, मयुर दळवी, सागर कुंभार, अजय मयेकर, चंद्रकांत बोंबले, अनिल आंद्रे, सुनिल गायकवाड, संभाजी तिकोणे, रवींद्र तिकोणे, विनायक तिकोणे यांनी विसापूर किल्ल्याकडे धाव घेतली.

वाटेतील धबधबे, चिकट शेवाळलेले दगड, चिखल, दाट झाडी झुडपे; यामधून त्याला चालवत आणणे शक्य नव्हते. त्यामुळे स्पाइन बोर्ड लावून स्केडच्या स्ट्रेचर मधून त्याला गावात आणले. पाटण गावातील नागरिकांनी मध्यरात्री बारा वाजता त्याचे चहापाणी केले. कपडे बदलून त्याला गाडीत बसवून दिले. तर इतर मित्रांना लोणावळा रेल्वे स्थानकावर सोडले. ग्रामस्थांनी, शिवदुर्ग व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी केलेल्या परिश्रमामुळे ( Maval ) तरुणाचे प्राण वाचले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.