Maval Corona Update: टाकवेजवळील कॉलनीतील नऊ महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण

Maval Corona Update: A nine-month-old baby from a colony near Takwe is infected with corona

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज (मंगळवारी) कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. टाकवे बुद्रुक गावाजवळ एका पुष्पशेती कंपनीच्या कामगार वसाहतीत एका नऊ महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी कामशेत येथेही एका नऊ महिन्यांच्या बाळाला कोरोना लागण झाली आहे. कोरोनाची बाधा झालेले हे तालुक्यातील दुसरे बाळ आहे.

मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी ही माहिती दिली. संबंधित बाळाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला त्याच्या आई-वडिलांनी ससून रुग्णालयात नेले होते. बाळाच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. बाळाच्या निकटच्या संपर्कातील आई-वडिलांसह सात जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे.

टाकवे-बेलज रस्त्यावरील सुयेक्स फ्लोरा कंपनीचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. टाकवे व बेलज ही दोन गावे बफर झोनमध्ये आहेत, असे मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी आदेशात नमूद केले आहे.

चांदखेडचे उर्वरित चारही रुग्ण कोरोनामुक्त

चांदखेड येथील उर्वरित चारही रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सात झाली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.