Pune :  पुण्यातही पावसाच्या जोरदार सरी

Heavy rain showers in Pune too

एमपीसी न्यूज – सोमवारी केवळ आकाशात ढग दाटून आले होते. तर आज, मंगळवारी सायंकाळ पासून रात्री उशिरापर्यंत पुणे शहराच्या विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य कामगारांची मात्र मोठी गैरसोय झाली. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते.

पावसामुळे रस्तेही निसरडे झाले होते. त्यामुळे काही ठिकाणी दुचाकी घसरून नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागले. कोंढवा, सिंहगड रोड, शिवाजीनगर, कोथरूड, कुमठेकर रस्ता, वारजे – माळवाडी, कर्वेनगर, शिवणे – उत्तमनगर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे पावसापासून बचावासाठी काही ठिकाणी नागरिकांनी रस्त्याच्या कडेला गर्दी केली होती. मात्र, पाऊस काही थांबण्याचे नाव घेऊना. मॉन्सून आता केरळात दाखल झाला आहे. मागील 3 दिवसांपासून पुण्यात काळेकुट्ट आभाळ भरून येत आहे. सोबतीला सोसाट्याचा वाराही आहे. त्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.

जून महिन्याची सुरुवात होताच पुण्यात पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यांत कमालीचा उकाडा जाणवला. कोरोना संकट काळात पुणेकर आधीच घरात बसून आहेत. पावसामुळे वातावरण आता गारेगार झाले आहे. बच्चे कंपनीसह उत्साही पुणेकरांनीही या पावसात भिजण्याचा आनंद घेतला.

त्यामुळे ज्या भागांत कोरोना नाही त्या ठिकाणी काही काळ नागरिकांची वर्दळ कमी झाली होती. यावर्षी लवकरच पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. चांगला पाऊस होणार असल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.