Maval : सात वर्षीय मुलीच्या अपहरण, खून प्रकरणी आज अंतिम सुनावणी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात सात चिमुकलीचे अपहरण करून ( Maval ) तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली. या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज (शुक्रवारी, दि. 22) शिवाजीनगर सत्र न्यायालयात होणार आहे. यातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील सात वर्षांच्या मुलीचे 2 ऑगस्ट 2022 रोजी अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हृदयद्रावक घटनेनंतर कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (वय 24, रा. कोथुर्णे) याला बेड्या ठोकल्या.
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. आज अंतिम सुनावणी होणार असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मावळ तालुक्यातील नागरिकांनी मागणी केली आहे. दरम्यान या सुनावणीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
विधिमंडळात पडसाद
अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणाचा राज्यभरातून निषेध करण्यात आला. तसेच या घटनेचे पडसाद राज्याच्या विधिमंडळात देखील उमटले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधिमंडळात या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे, तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी केली होती. तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक संस्थांमधून देखील या घटनेचा निषेध करण्यात आला होता.
वकिलांकडून वकीलपत्र न घेण्याचा निर्णय
ही घटना मन सुन्न करणारी होती. सर्व स्तरातून या घटनेबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले. मावळ तालुक्यातील वकील संघटनांकडूनही या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने घेऊ नये असा निर्धार देखील वकिलांकडून ( Maval ) करण्यात आला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.