Maval : विहिरीत पडलेल्या घोणस सापाला जीवदान

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील (Maval) तिकोना पेठ येथे एका विहिरीत पडलेल्या विषारी घोणस सापाला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी जीवदान दिले. खोल विहिरीच्या पाण्यात उतरून जीवाचा धोका पत्करून सदस्यांनी सापाला पकडून सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. यामुळे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य मोरेश्वर मांडेकर यांना गुरुवारी (दि. 14) तिकोना पेठ येथील नागरिकांनी फोन करून एका विहीरीत साप असल्याची माहिती दिली. मांडेकर यांनी संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांना कळवले.

 

गराडे यांनी पवनानगर येथील सदस्य रमेश कुंभार, शत्रुघ्न रासनकर, संतोष दहिभाते यांच्याशी संपर्क करून त्यांना तिकोना पेठ येथे पाठवले. सदस्यांनी पाहणी केली असता मागील दोन ते तीन दिवसांपासून हा साप विहिरीत पडला होता. तो बाहेर निघण्यासाठी धडपडत होता. तसेच हा साप विषारी घोणस जातीचा असल्याची खात्री झाली. सदस्यांनी सुरुवातीला विहिरीच्या वरून प्रयत्नपूर्वक (Maval) सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

Nigdi : खांदेश मराठा मंडळातर्फे महिला दिनानिमित्त स्वयंरोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन

 

बराच वेळ प्रयत्न करूनही सापाला बाहेर काढता आले नाही. त्यामुळे रमेश कुंभार हे स्वतः विहिरीत उतरले. विहिरीच्या खोल पाण्यात चपखलपणे पोहणाऱ्या सापासोबत कुंभार हे एकटेच होते. कुंभार यांनी बराच वेळ प्रयत्न करून सापाला सुरक्षितरीत्या पकडले. त्यानंतर त्याला बाहेर काढून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

 

जीवाची जोखीम पत्करून वन्यजीव व रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी या सापाला जीवदान दिले. याबद्दल त्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे. कुठेही जखमी वन्य प्राणी दिसल्यास वन विभाग (1926) आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था (9822555004) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.