Maval Loksabha Election : श्रीरंग बारणे हॅटट्रिक मारणार की, भाजप-राष्ट्रवादीला संधी?

महायुतीकडून मावळचा उमेदवारच ठरेना; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

एमपीसी न्यूज (प्रभाकर तुमकर) – लोकसभेची निवडणूक जाहीर होऊन (Maval Loksabha Election) आठवडा उलटला आहे. तरी अद्याप महायुतीकडून मावळ लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निश्चित झालेला नाही. महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांच्या नावाची घोषणा झाली असून आघाडीतील सर्व घटक पक्ष त्यानुसार तयारीला लागले आहेत. दरम्यान महायुती मधील शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे मावळसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र त्यांच्या उमेदवारीला काही ठिकाणी विरोध होत आहे. भाजपकडून माजी मंत्री बाळा भेगडे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बापूसाहेब भेगडे इच्छुक आहेत. त्यामुळे पुढील काळात ठरणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी पासून निवडून येण्यापर्यंत मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट (महाविकासआघाडी) कडून संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या विरोधात महायुतीतील शिंदे गटाचे श्रीरंग बारणे की, भाजपाकडून माजी मंत्री बाळा भेगडे का राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे हे लढणार या चर्चेला उधाण आले आहे.

महायुतीकडून श्रीरंग बारणे यांचीच उमेदवारी अंतिम झाली असून तेच विजयाची हट्रिकक करतील असा दावा बारणे समर्थकांकडून केला जात आहे. (Maval Loksabha Election)

आमदार सुनील शेळके यांनी बारणे यांनी दहा वर्षातील कार्यकाळात कामाचा लेखा जोखा मांडावा, त्यानिमित्ताने त्यांनी बारणे यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध दर्शविला होता. तसेच माजी मंत्री विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करत त्यांच्यावर तोंडसुख घेतल्याबद्दल मावळ राष्ट्रवादीने, शिंदे गटाने शिवतारेना आवरा अन्यथा आम्ही शिंदे गटातील उमेदवाराचे काम करणार नाही, असे ठणकावले आहे.

LokSabha Elections 2024 : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मुळशी परिसरातील मतदान केंद्रांना भेट

मावळ भाजपाने दोन वेळा मोदींचे नाव घेऊन भाजपाच्या पाठिंब्यावर निवडून आलेले बारणे, मित्र पक्षाचा मानसन्मान ठेवण्यात यशस्वी ठरतील का? तर मागील आठवड्यात माजी मंत्री बाळा भेगडे यांचे घरी मावळ भाजपाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांकडून बाळा भेगडे यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. भेगडे यांना उमेदवारी न मिळाल्यास नोटाला मतदान करू, असा पवित्रा सर्वांनी घेतला. त्यावेळी एकंदरित बारणे यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

हा मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाल्यास उमेदवार म्हणून बापूसाहेब भेगडे यांच्या नावाची चर्चा वरिष्ठ पातळीवर जोर धरु लागली आहे.

एकंदरीत युतीची उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून, पक्षश्रेष्ठी आपआपल्या कार्यकर्त्यांना (नेत्यांना) समज देणार का? युतीतील अंतर्गत कुरबुरी व वाघेरे यांनी (Maval Loksabha Election) प्रचारात घेतलेली आघाडी वाघेरे यांच्या पथ्यावर पडणार का? की, मोदी लाटेत पुन्हा एकदा युतीचा उमेदवार मैदान मारणार, या वर गप्पा रंगू लागल्या आहेत. तर्कवितर्क लढविले जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.