_MPC_DIR_MPU_III

Maval News: कोरोना नियंत्रणासाठी गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करा – आयुष प्रसाद

एमपीसी न्यूज – तालुकानिहाय, शहरनिहाय व गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करून कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती देऊन जनजागृती करावी तसेच गावपातळीवर जाऊन प्रत्यक्ष काम करावे, अशा सूचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

_MPC_DIR_MPU_IV

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सभागृहात आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहात कोरोना आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस प्रांत अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, प्रकल्प संचालक लांबोरे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी वाजे, वैद्यकीय अधिकारी गुणेश बागडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक झिंजाड, लोणावळा मुख्याधिकारी रवी पवार, वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी सुवर्णा ओगले तसेच डॉ. सुचित्रा नागरे, डॉ. सुदीप कुमार, डॉ. स्वाधीन ढाकणे आदी उपस्थित होते.

आयुष प्रसाद म्हणाले की, मावळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून तो रोखण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व स्तरावर शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड आवश्यक आहे. कोरोना तपासण्या वाढविण्यात याव्या. हायरिस्क कॉन्टॅक्ट शोधून त्यांना तात्काळ होम क्वारंनटाईन करावे.

 माहितीबाबत पारदर्शकता ठेवण्याची रुग्णालयांना सूचना

मावळ तालुक्यात कोरोनावर मात करण्यासाठी अत्यंत चांगले व्यवस्थापन आपण करीत आहोत. शासकीय आणि खाजगी रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार घेण्यासाठी शासनाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना मिळाला पाहिजे. सर्व रुग्णालयांनी कोरोना उपचारासंबंधीचे दरपत्रक, त्यांच्याकडे उपलब्ध असलेले बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची माहिती, महात्मा फुले योजनेची माहिती असे फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.

कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व आरोग्यविषयक सुविधा सज्ज ठेवाव्यात. या बैठकीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या, कंटेनमेंट झोन, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, ग्रामीण भागातील सद्यस्थिती तसेच उपचार सुविधा तसेच कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक विभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

शासकीय अधिकारी, कोविड समर्पित रुग्णालये, डॉक्टर यांच्या समस्या व शंकाचे विस्तृतपणे निरसन आयुष प्रसाद यांनी केले. शासनाकडून मिळणाऱ्या सेवा-सुविधा याची सविस्तरपणे माहिती त्यांनी दिली.

आजही व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना विविध हॉस्पिटलचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड मिळावेत, रुग्णांची खाजगी हॉस्पिटलकडून होणारी हेळसांड रोखली जावी. या नियंत्रणासाठी कोरोना उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये प्रशासनाकडून अधिकारी समन्वयक म्हणून नेमण्यात येणार आहे. तसेच त्या अधिकार्‍याचे नाव, संपर्क क्रमांक याची माहिती तेथे लावण्यात येणार आहे. खाजगी हॉस्पिटलकडून आकारण्यात येणारी बिले, तसेच शासनाकडून मिळालेली सवलत याबाबतची माहिती घेऊन ऑडिट करण्यात येणार आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.

दोन समन्वयक अधिकारी व मोफत रुग्णवाहिका सेवा 

कोरोना संबंधित औषधांचा तपशील तसेच औषध कुठे उपलब्ध आहे व औषधे उपलब्ध करून देण्यास मदत करण्याचे काम प्रशासनाकडून केले जाईल त्यासाठी दोन अधिकाऱ्यांचे नंबर लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील. कोविड संबंधित रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा पुरवण्यात येणार असून त्यासाठीचा संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात येईल.

समन्वयाने काम करून कोरोनावर नक्की मात करू – आमदार सुनील शेळके
कोरोना विरुद्धची लढाई आपल्याला बरीच काळ लढावी लागणार आहे, या संकटकाळात प्रशासन चांगले काम करीत असुन येणाऱ्या काळात सर्वांनी समन्वयाने काम केल्यास वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करुन कोरोनावर आपण नक्कीच मात करु, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.