Maval News: केंद्र सरकारच्या विस्तारात शिंदे गटाला तीन मंत्रीपदे? श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा

एमपीसी न्यूज – केंद्रीय मंत्रीमंडळाचा लवकरच (Maval News) विस्तार होण्याची शक्यता असून त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला स्थान मिळणार आहे. शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे किंवा तीन राज्यमंत्रीपदे मिळू शकतात अशी चर्चा आहे. त्यात मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्याचे खासदार बारणे संसदेत प्रतिनिधीत्व करतात. पुणे जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी खासदार बारणे यांना मंत्रीपद देण्यात येईल, असे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीला सव्वा वर्ष राहिले आहेत. त्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि भाजपच्या सहकार्याने  मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना भाजपसोबत आहे. विधानसभेप्रमाणे लोकसभेतही 13 खासदारांचा शिंदे यांचा गट आहे.

शिंदे यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री अशी तीन पदे मागितली आहेत. पण, भाजपने तीन राज्यमंत्री देण्याचे ठरविले असल्याचे सांगितले जाते.

केंद्रातील मंत्रीपदासाठी शिंदे गटातील मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह मुंबईचे राहुल शेवाळे, गजानन किर्तीकर, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. त्यात किर्तीकर आणि शेवाळे दोघेही मुंबईतील आहेत. त्यामुळे मुंबईतून एकाचीच वर्णी लागेल.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खास मर्जीतील आहेत. त्यामुळे बारणे यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होईल असे सांगितले जात आहे. मावळ या मतदारसंघात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग येतो. त्यामुळे बारणे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यास या दोन्ही भागाला प्रतिनिधीत्व मिळेल.

शिंदे गटाचे पुणे जिल्ह्यातील खासदार बारणे एकमेव लोकप्रतिनिधी – Maval News

खासदार श्रीरंग बारणे यांचा नगरसेवक ते खासदार असा राजकीय प्रवास आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याचा समावेश असलेल्या मावळचे सलग दुस-यावेळी खासदार बारणे देशाच्या संसदेत प्रतिनिधीत्व करत आहेत.

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा 2014 मध्ये आणि 2019 मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा बारणे यांनी पराभव केला आहे. पवार घराण्यातील उमेदवाराचा पराभव केल्याने बारणे यांचे नाव देशाच्या राजकारण पोहोचले आहे.

शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातून बारणे एकमेव लोकप्रतिनिधी होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. शिंदे यांनीही बारणे यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उपनेते केले. आता केंद्रीय मंत्रीमंडळात बारणे यांना संधी देवून पुणे, रायगड जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे प्रयत्नशिल असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बारणे यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होईल (Maval News) असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.