Pune …….. कदाचित अजितदादा नवीन पक्ष काढतील !- भाजप खासदार संजय काकडे

एमपीसी न्यूज- अजित पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर भाजपचे खासदार संजय काकडे यांनी अजित पवार यांच्याबाबत आपले आडाखे बांधले आहेत. खासदार काकडे म्हणाले की, अजित पवारांची धडाडी पाहता ते घरी बसणार नाहीत कदाचित एखादा वेगळा पक्ष काढतील अशी शक्यता काकडे यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना खासदार संजय काकडे म्हणाले की, अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अजित पवार यांचेही राज्यात अनेक नेते अनेक कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे ते नवीन पक्ष स्थापन करतील अशी शक्यता आहे.  राज ठाकरे यांचा दाखला देताना काकडे यांनी सांगितले की, राज ठाकरे यांनीही असंच अज्ञातस्थळी जाऊन पक्ष स्थापन केला होता.

गुन्हा दाखल झाल्यामुळे अजित पवार यांनी राजीनामा दिला असेल असे वाटत नाही, हा त्यांच्या राजकीय पक्षाचा वैयक्तिक विषय असेल, तथापि शरद पवार सांगत असलेले कारण मला योग्य वाटत नाही. अजित पवार हे शरद पवारांपासून दूर गेले तर राष्ट्रवादीचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल, शरद पवारांना हे खूप महागात पडेल असेही काकडे म्हणाले.

आमच्या पक्षाला बदनाम करून शरद पवार सहानुभूती मिळवत आहेत मात्र त्यांना सहानुभूती मिळणार नाही, आमच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास खासदार काकडे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.