Pune News : रूबी हॉस्पिटलच्या कारभाराविरोधात आमदाराने दंड थोपटले; उपोषणाचा दिला इशारा

एमपीसी न्यूज – गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी नकार देणाऱ्या रुबी हॉस्पिटल विरोधात शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी दंड थोपटले आहेत. शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील एका अपघातग्रस्त मुलावर उपचार करण्यास नकार दिल्याने रुबी हॉस्पिटल च्या कारभाराविरोधात उपोषण करण्याचा इशारा अशोक पवार यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांना पत्र पाठवले आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील विश्वजीत संजय गायकवाड या पंधरा वर्षे मुलाचा अपघात झाला होता. त्याच्या मेंदूला मार लागल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या कुटुंबियांची परिस्थिती नाजूक असतानाही त्यांनी एक लाख आठ हजार रुपये हॉस्पिटलकडे भरले होते. मात्र आणखी पैसे भरण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णाला वेठीस धरण्यात आले. बिलाचे पैसे भरता येत असल्यास रुग्णाला घरी घेऊन जा अशा शब्दात त्यांनी सुनावले होते.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर शिरूरचे आमदार अशोक पवार चांगले संतापले. संबंधित रुग्णाच्या कुटुंबाने धर्मादाय आयुक्तांच्या सवलतीतुन उपचारासाठी अर्ज केला होता. त्यावरही निर्णय न घेता रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला. दरम्यान रुबी हॉस्पिटल विरोधात अनेक तक्रारी असल्याने त्यांच्यावर योग्य कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी अशोक पवार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.